एजाज हुसेन मुजावर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर : राज्यातील सत्ताधारी भाजपअंतर्गत राजकारणात अडगळीत पडलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वत:ची शक्ती अजमावण्यासाठी शिवशक्ती परिक्रमा सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्यात त्यांचे सर्वत्र जंगी स्वागत झाले. स्वागतासाठी पुढे सरसावलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच समर्थक होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमेतून त्यांचे स्वत:चे शक्तिप्रदर्शन घडताना दिसून आले नाही.

मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमेचे सांगली येथून सोलापूर जिल्ह्यात सांगोला येथे आगमन झाले. तेथे शेकापचे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सांगोला शहरात भाजपचे माढा विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, करमाळा आदी भागात पंकजा मुंडे यांचे स्वागत करताना स्थानिक नेत्यांनी कोणतीही कसर ठेवली नव्हती. सोलापुरात आमदार विजय देशमुख यांच्या समर्थकांनी भर पावसात पंकजा मुंडे यांचे वाजत गाजत स्वागत केले. अक्कलकोटमध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही स्वागताचा बार उडविला. बार्शीतही पक्षाचे सहयोगी सदस्य असलेले अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी स्वत:ची ताकद दाखवत पंकजा मुंडे यांचे जल्लोषात स्वागत केले.

हेही वाचा >>> दंगलीनंतर साताऱ्यात तणाव; एकाचा मृत्यू, दहा जखमी, घरे, दुकानांसह प्रार्थनास्थळाचीही जाळपोळ

करमाळय़ातही पक्षाची ताकद नसतानाही जेसीबीच्या साहाय्याने पंकजा मुंडे यांच्या वाहनावर गुलाल आणि पुष्पवृष्टी करून वाजतगाजत स्वागत झाले. या शिवशक्ती परिक्रमेत पंकजा मुंडे यांनी कोठेही पक्ष बांधणीच्या विचारासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अन्य नेत्यांचा साधा उल्लेखही न करता स्वत:च्या मर्यादा मांडल्या. राज्यात भाजपच्या अन्य नेत्यांच्या अडचणीतील साखर कारखान्यांना महायुती शासनाने सुमारे ५५० कोटी रुपयांच्या कर्ज रूपाने मदतीचा हात पुढे केला. परंतु आपल्या स्वत:च्या अडचणीतील साखर कारखान्याला मदतीविना वंचित ठेवले गेले. आपण सध्या आमदार, खासदार नाही. राज्यात पक्षाची कोणती जबाबदारी नाही. मध्य प्रदेशाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे तेथे जाणे होते. इकडे महाराष्ट्रात कोणती जबाबदारी वा पद नसल्यामुळे जनसंपर्क होत नाही, अशा अडचणींचा पाढा सांगत पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली.

हेही वाचा >>> कोल्हापूरमध्ये अजित पवारांचे टीकेला उत्तर

आपल्या शिवशक्ती परिक्रमेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला असला तरी सोलापूर जिल्ह्यापुरते म्हणायचे तर त्याचे फारसे फलित दिसून येत नाही. राज्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भाजपवर मजबूत पकड असून पक्षाचे बहुसंख्य आमदार त्यांचेच नेतृत्व मानतात. त्यास अर्थात सोलापूर जिल्हाही अपवाद नाही. पंकजा मुंडे यांचे स्वागत करणा-यांपैकी आमदार विजय देशमुख हे पूर्वी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. एकदा पक्षश्रेष्ठींशी मतभेद झाल्यामुळे गोपीनाथ मुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेऊन पदाचा राजीनामा दिला होता. त्या वेळी सोलापूरचे विजय देशमुख यांनीही मुंडे यांच्या समर्थनार्थ आमदारकीचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपविला होता.

नंतर पुढे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा उदय झाला. त्यांनी पाहता पाहता राज्यात संपूर्ण पक्ष काबीज केला. परिणामी, पक्षातील बहुसंख्य आजी-माजी मंत्री लोकप्रतिनिधी, अन्य नेते फडणवीस यांच्या प्रभावाखाली आले. सोलापुरात आमदार विजय देशमुख व आमदार सुभाष देशमुख या दोघांनी मंत्रिपद मिळाले नसले तरी नाराज न होता फडणवीस यांचे नेतृत्व पत्करले आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, मंगळवेढा-पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे, अकलूजचे नेते, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्यासह पंढरपूरचे प्रशांत परिचारक, प्रा. लक्ष्मण ढोबळे आदी सा-या मंडळींचे फडणवीस हेच तारणहार बनले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis supporters are in the forefront in solapur to welcome pankaja munde ysh
Show comments