Devendra Fadnavis New CM of Maharashtra Oath Taking Ceremony : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतल्या आझाद मैदान या ठिकाणी दिमाखादार सोहळ्यात शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर उपस्थित झाल्यानंतर ५ वाजून ३१ मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
देवेंद्र फडणवीस यांनी काय शपथ घेतली?
मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबाबत मी खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता आणि एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक आणि सद्सद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान आणि कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निःपक्षपातीपणे तसेच कुणाविषयीही ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन.
आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मी, देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी हे खेरीज करुन मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तिंना कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. अशी शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर एकच जल्लोष पाहण्यास मिळाला. या शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
महाराष्ट्रात महायुतीला महाप्रचंड यश
महाराष्ट्रात महायुतीला निवडणुकीत महाप्रचंड यश मिळालं. २३७ जागांवर महायुतीला यश मिळालं आहे. २३ तारखेला निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार? यावर बराच खल झाला. त्यानंतर ४ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालं. आज देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.