राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये तुफान कलगीतुरा रंगताना पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूममीवर अधिवेशन शेवटाकडे येत असताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत भाषण केलं. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर केलेल्या भाषणात त्यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टोला लगावला. तसेच, यावेळी विं.दा. करंदीकर यांच्या कवितेतल्या ओळी ऐकवून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर देखील तोंडसुख घेतलं!
“कदाचित मुख्यमंत्री विसरले असतील…”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये मविआ सरकारने केलेल्या कामांविषयी, राबवलेल्या उपाययोजनांविषयी आणि घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांविषयी माहिती दिली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर फडणवीसांनी खोचक टोला लगावला. “आज आनंदाची गोष्ट आहे की छोटं का होईना, पण मुख्यमंत्र्यांचं भाषण या सभागृहात ऐकायला मिळालं. त्यांनी चांगलं काम करत असल्याचं सांगितलं. कदाचित ते विसरले असतील. ५० हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना द्यायचे होते वगैरे आश्वासनं होती. पण त्यांचं भाषण ऐकायला मिळालं याचा आनंद आहे”, असं फडणवीस म्हणाले.
विं. दा. करंदीकरांच्या कवितेतल्या ओळी…!
दरम्यान, सरकारवर टीका करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी विं. दा. करंदीकर यांच्या कवितेतल्या काही ओळी वाचून दाखवल्या. “सरकार नावाची यंत्रणा किती उदास झालीये आणि लोकांबाबत काही देणंघेणंच नाहीये. केवळ टीका, आरोप, टोमणे यापलीकडे सरकारकडून काहीच होत नाहीये” असं म्हणताना फडणवीसांनी पुढील ओळी वाचून दाखवल्या…
सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते.. तेच ते…
माकडछाप दंतमंजन,
तोच चहा तेच रंजन
तीच गाणी तेच तराणे,
तेच मूर्ख तेच शहाणे
सकाळपासुन रात्रीपर्यंत
तेच ते तेच ते
खानावळीही बदलून पाहिल्या
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं.
काकू पासून ताजमहाल,
सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला, गरम मसाला,
तोच तो भाजीपाला
तीच ती खवट चटणी,
तेच ते आंबट सार
सुख थोडे दु:ख फार…
“आम्हाला आज समजलं, प्रश्न विचारायला अक्कल…”
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील एका संदर्भाचा उल्लेख करत फडणवीसांनी त्यावरून देखील टोला लगावला. “आमचे मुख्यमंत्री म्हणतात, की प्रश्न विचारायला अक्कल थोडी लागते. आम्हाला माहितीच नव्हतं. आम्ही उगीच २०-२२ वर्ष तारांकित-अतारांकित प्रश्न विचारत राहिलो. आधीच हे समजलं असतं, तर नसते विचारले. काहींना संसदेत संसदरत्न पुरस्कार मिळतो अधिक प्रश्न विचारल्याबद्दल. पण आज आम्हाला समजलं, प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
“आमची चूक झाली, आम्ही…”
यावेळी मविआ शब्दाची फोड करताना फडणवीसांनी राज्य सरकारच्या निर्णयांवरून खोचक टोला लगावला. “आमची चूक झाली, आम्ही मविआ म्हणजे महाविकास आघाडी समजलो. मग लक्षात आलं महाविनाश आघाडी आहे. नंतर लक्षात आलं महावसुली आघाडी आहे. पण अलिकडच्या काळात ही मद्य विक्री आघाडी झाली आहे. किती दूरचा विचार करून तुम्ही त्या वेळी मविआ नाव ठेवलं. कारण पेट्रोल-डिझेलचा कर कमी केला नाही. पण दारूविक्रीचा कमी केला. करोनाच्या काळात मंदिरं बंद मदिरालय सुरू होते, क्लास बंद आणि ग्लास सुरू होते”, असं फडणवीस म्हणाले.