Devendra Fadnavis Targets Rahul Gandhi: बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू यावरून महाराष्ट्रभर खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडे नेतेमंडळी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. याचवेळी सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये राजकीय आरोप होत आहेत. याचसंदर्भात आज एकीकडे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं असताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींवर टीकास्र सोडलं आहे.

तो दलित होता म्हणून त्याची हत्या – राहुल गांधी

लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार यांनी आज परभणीतील मयत सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबाची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं. “सोमनाथ सूर्यवंशी दलित होता आणि राज्यघटनेचं संरक्षण करत होता म्हणून त्याची हत्या करण्यता आली. आरएसएसची विचारसरणी राज्यघटनेला संपवण्याची विचारसरणी आहे. ही १०० टक्के कस्टोडियल डेथ आहे. पोलिसांनी त्याची हत्या केली आहे”, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

“आमची इच्छा आहे की हे प्रकरण तातडीनं सोडवलं जावं. ज्या लोकांनी हे केलं आहे त्यांना शिक्षा मिळावी. हे कोणतंही राजकारण नाही. एक हत्या झाली आहे. ही न्यायाची गोष्ट आहे. विधानसभेत मुख्यमंत्री पोलिसांना संदेश देण्यासाठी खोटं बोलले आहेत”, असंही राहुल गांधी म्हणाले.

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले, “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यामागे…”

देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर

दरम्यान, पुण्यात देवेंद्र फडणवीसांना यासंदर्भात माध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी राहुल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. “राहुल गांधी फक्त राजकीय हेतूने आले होते. ही केवळ राजकीय भेट होती. लोकांमध्ये आणि जातीजातींमध्ये द्वेष निर्माण करायचा हे एकच ध्येय त्यांचं आहे. तेच काम गेली अनेक वर्षं ते सातत्याने करत आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचं विद्वेषाचं काम पू्र्ण केलं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“महाराष्ट्राचं सरकार संवेदनशील असल्यामुळेच आम्ही या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी घोषित केली आहे. त्यात सर्व सत्य बाहेर येईल. काहीही लपवण्याचं कारण नाहीये. जर त्या चौकशीत कोणत्याही प्रकारे मारहाणीमुळे किंवा इतर गोष्टींमुळे हा मृत्यू झाला आहे असं बाहेर आलं तर कुणालाही सोडलं जाणार नाही. कठोरात कठोर कारवाई केली जाईल”, असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिलं.

Story img Loader