संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आता तणावात रुपांतरीत होऊ लागल्या आहेत. संभाजीराजेंना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात असताना ऐनवेळी कोल्हापूरच्या संजय पवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे अपेक्षाभंग झाल्याची भावना संभाजीराजे छत्रपतींच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून राज्य सरकारवर टीका केली जात असताना विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
“शरद पवारांनी हा विषय सुरू केला”
राष्ट्र्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा विषय आधी सुरू केला होता, असं फडणवीस म्हणाले. “आधी शरद पवारांनी हा सगळा विषय सुरू केला. त्यानंतर ज्या दिशेने तो विषय गेला, ते सगळं वेगळंच काहीतरी झालं आहे. कदाचित त्यांची (संभाजीराजे छत्रपती) कोंडी करण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. पण तो त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर मी बोलण्याचं कारण नाही”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
महागाईवरून शरद पवारांवर टीका
दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महागाईच्या मुद्द्यावरून शरद पवारांवर निशाणा साधला. “शरद पवारांनी या गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे की पेट्रोल-डिझेलवर राज्याचा कर २९ रुपये आणि केंद्राचा कर १९ रुपये आहे. राज्याचा कर ते का कमी करत नाहीत? सगळ्यात जास्त महागाई वाढवण्याचं काम महाराष्ट्राचं सरकार करत आहे. २९ रुपये कर पेट्रोल-डिझेलवर लावून एक रुपयाही कमी न करता हे लोक महागाईवर कसे बोलू शकतात? याचं मला आश्चर्य वाटतं”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.