एकीकडे राज्यात सत्ताधारी शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार अजूनही कायम असताना दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध सर्वपक्षीयांना लागले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे मुंबईच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यादरम्यान नड्डांनी भाजपाच्या पदाधिकारी, पन्ना प्रमुखांच्या मेळाव्यात उपस्थिती लावली. तसेच, काही बैठकाही घेतल्या आहेत. मुंबईत झालेल्या मेळाव्यात बोलताना भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी मुंबई पालिका निवडणूक जिंकण्याचा निर्धार व्यक्त करतानाच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली.
“याहून मोठा अन्याय काय असेल?”
“अडीच वर्षं ज्यावेळी करोनाचं संकट होतं, तेव्हा दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसं करोनाच्या संकटाबरोबर उद्धव ठाकरेंचंही सरकार होतं. त्याला दुष्काळात तेरावा महिन्यासारखंच होतं. त्या काळात त्यांचं सरकार यावं, यापेक्षा आपल्यावर अजून काय अन्याय होऊ शकतो? पण अशा काळात भाजपाचा एकही मोर्चा घरी बसला नाही. प्रत्येकानं करोनाच्या काळात लोकांची सेवा केली”, असं फडणवीस म्हणाले.
“शिवसेना उद्धवजींचा फोटो लावून निवडून आली नव्हती”
“खरंतर शिवसेना आपल्याबरोबर निवडून आली होती. मोदींचे मोठमोठे फोटो लावून निवडून आली होती. उद्धव ठाकरेंचा फोटो स्टॅम्पसाईज आणि मोदींचा फोटो मोठा असं लावून निवडून आली होती. ती काय उद्धवजींचा फोटो लावून निव़डून आली नव्हती. पण तरी आपल्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर ते गेल्यानंतर शिवसेनेत जे खरे बाळासाहेब ठाकरेंचं पाईक होते, त्यांच्या विचारांवर चालणारे होते ते शिंदेंच्या नेतृत्वात बाहेर पडले. ते आपल्याबरोबर आले. ज्यांना २०१९ ला जनतेनं निवडून दिलं होतं, तीच शिवसेना आणि भाजपाचं सरकार आज पुन्हा स्थापन झालं”, असा टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
Video: “मला वाटतंय उद्धवजींना कुणीतरी सांगावं की…”, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला; म्हणाले, “राजे-महाराजांपेक्षा…!”
“अडीच वर्षं मोदींचा विकास तुम्ही थांबवून ठेवला. अडीच वर्षांत देशभरात मेट्रोची कामं होत होती. आमची मेट्रोची कामं बंद होती. रस्त्याची कामं बंद होत होती. विकास बंद होता. सगळ्या गोष्टींना स्थगिती होती. एकच कारण होतं की ही सगळी कामं पूर्ण झाली, तर भाजपाला त्याचं श्रेय मिळेल”, अशीही टीका फडणवीसांनी केली.
“राजाचा जीव पोपटात आहे”
“यांनी केवळ वसुली केली. ती किती केली हे माहितीच आहे. वाझेची कथा सांगायची गरज नाही. यांच्या वसुलीची वेगवेगळी माध्यमं आहेत. पण यांनी महाराष्ट्राचा सूड उगवण्याचं काम केलं. आपलं सरकार स्थापन झालंय. पण राजाचा जीव पोपटात आहे. पण दुसरा पोपट बीएमसी आहे. २५ वर्षं हे कुरण खाऊन हे मोठे झालेत. मुंबईची तिजोरी लुटून मोठे झाले आहेत. यांनी अडीच वर्षं धारावीच्या प्रकल्पाला यांनी हातही लावला नाही. पुढच्या ३-४ महिन्यांत धारावीचं काम सुरू होईल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“आपण काम करत असताना यांचा आरोप की तुम्ही मुंबईचे पैसे संपवतायत. पैसे काय चाटण्यासाठी ठेवलेत का? आणि एवढी कामं करून पालिकेच्या तिजोरीत १० हजार कोटींची वाढच झाली आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिका आपल्याला जिंकायचीच आहे. ती मुंबईच्या जनतेच्या हातात द्यायची आहे. त्यानंतर मोदींच्या नेतृत्वात लोकसभा आणि विधानसभा आपण जिंकू”, असा विश्वास फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.