गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मुंबईतील याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण झाल्याचा मुद्दा जोरदार चर्चेत आहे. या कबरीचं सुशोभीकरण करून एका दहशतवाद्याचं प्रतिमा संवर्धन केलं जात असल्याचा आरोपही केला जातोय. मात्र, अशा प्रकारे कोणतंही सुशोभीकरणाचं काम याकूबच्या कबरीवर झालं नसल्याचं या कब्रिस्तानच्या ट्रस्टींनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात वेगवेगळे दावे-प्रतिदावे सुरू असून आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि याकूबला फाशी दिली, तेव्हाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीकास्र सोडलं आहे.

नेमका काय आहे वाद?

भाजपा नेते राम कदम यांनी याकूब मेमनच्या कबरीचे फोटो ट्वीट करन त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. याकूब मेमनच्या कबरीचं उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने सुशोभिकरण झालं का? असा सवाल राम कदम यांनी ट्वीटमध्ये उपस्थित केला होता. त्यावरून वाद निर्माण झाला. यानंतर कबरीवर लावलेले लाईट्स काढण्यात आले.

या सर्व वादावर ट्रस्टचे ट्रस्टी शोएब खातिब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “या बातमीत कोणतंही तथ्य नाही की याकूब मेमनच्या कबरीसाठी मार्बल, लाईट वगैरे लावण्यात आले. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. मोठ्या कब्रिस्तानांमध्ये अनेक कबरींवर अशा प्रकारे मार्बल लावलं जातं. लाईट लावलेला जो व्हिडीओ आपण पाहात आहात, तो ‘बडी रात’च्या वेळेचा आहे. शब-ए-बारातच्या वेळी गेल्या तीन वर्षांत कोविडमुळे हे काहीच होऊ शकलं नाही. त्यामुळे यावेळी मुंबईतल्या मोठ्या कब्रिस्तानातच नाही, तर सर्वच कब्रिस्तानांमध्ये हे केलं गेलं आहे”, असं ते म्हणाले आहेत.

“बॉम्बस्फोट करणाऱ्यांना कोण संरक्षण देतं हे…”

दरम्यान, या मुद्द्यावरून आता फडणवीसांनी सूचक शब्दांमध्ये थेट महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. “मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांना कोण कोण संरक्षण देतं हे आम्ही पाहिलं आहे. त्यांचे साथीदार अजूनही जेलमध्ये बसले आहेत, ज्यांना मंत्री बनवलं गेलं”, असं ते म्हणाले.

“रात्री २ वाजता सर्वोच्च न्यायालय उघडलं”

“सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो. आमच्या सरकारमध्ये हिंमत होती. रात्री २ वाजता सर्वोच्च न्यायालय उघडलं. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेतली आणि त्यानंतर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला फाशी दिली गेली. हे प्रतिमा संवर्धन कुणाच्या काळात झालं, हे तुम्हाला माहिती आहे”, अशा सूचक शब्दांत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकार आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

Story img Loader