दिल्लीच्या तख्तापुढे छत्रपती शिवाजी महाराज कधीच झुकले नव्हते. आताचा महाराष्ट्र तरी कसा झुकेल? काळी संपत्ती गोळा करणार्या कृपाशंकरसिंह यांना उमेदवारीच्या पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे. मात्र भाजपा वाढविण्यात ज्यांची हयात गेली, त्या नितीन गडकरी यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा. महाविकास आघाडीत या, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच महाविकास आघाडीत सामील होण्याची ऑफर दिली आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या ऑफरवर खास आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.
मराठा आरक्षणावर काय म्हणाले फडणवीस?
मराठा आरक्षण हे न्यायालयाने वैध ठरवलं होतं. त्यानुसारच भरती प्रक्रिया करायला सांगितली होती. आता पुन्हा एकदा न्यायालयाने तसेच निर्देश दिले आहेत. कारण ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मी उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश वाचलेले नाहीत असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मी अनुभवाच्या आधारावर ही गोष्ट सांगतो आहे.
मावळमध्ये गोळीबार झाला तेव्हा कुणाचं सरकार होतं?
जागा वाटपाची वाट बघा, अधिकृतरित्या सगळं काही कळेल आणि आम्ही तुम्हाला सांगू असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.सुप्रिया सुळेंनी आज टीका केली अब की बार गोळीबार सरकार, यावर विचारलं असता फडणवीस म्हणाले, “मी सुप्रिया सुळेंना इतकंच विचारु इच्छितो जेव्हा मावळचा गोळीबार झाला तेव्हा कुणाचं सरकार होतं? ज्यावेळी राज्यातल्या ११३ गोवारींचा पोलीस लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला होता तेव्हा कुणाचं सरकार होतं? सुप्रिया सुळे आत्ता विरोधी पक्षाच्या मोडमध्ये आहेत. त्यामुळे त्या रोज अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत फार गांभीर्याने घेण्याचं काही कारण नाही.”
हे पण वाचा- “संजय राऊत यांच्या सारख्या घरगड्यांनी…”, नितीन गडकरींच्या विधानाबाबत भाजपाची पहिली प्रतिक्रिया
उद्धव ठाकरेंनी गडकरींना ऑफर देणं म्हणजे
“ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरींसारख्या नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे गल्लीतल्या व्यक्तीने मी तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती करतो हे सांगण्यासारखं आहे. नितीन गडकरी हे महाराष्ट्रातल्या नागपूरमधून लढतात, ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पहिली यादी आली त्यात महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याचं नाव नव्हतं. महाराष्ट्राचा निर्णय झाला नव्हता, त्यामुळे आम्ही ती चर्चा केली नाही. महायुतीचा निर्णय होऊन महाराष्ट्रातल्या जागांवर जेव्हा चर्चा होईल त्यावेळी सर्वात आधी नितीन गडकरींचं नाव येईल. त्यामुळे मला वाटतं स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत.” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.