Devendra Fadnavis On Trolling : विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. मुंबईतील आझाद मैदानावर काल (५ डिसेंबर) पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीसांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांच्यावर टीका करणाऱ्या ट्रोलर्सचे आभार मानले आहे. फडणवीस सह्याद्री वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्रोलर्सचे आभार मानतो, कारण…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या आयुष्यातील चढउतार आणि त्यांच्यावर विरोधकांकडून तसेच ट्रोलर्सकडून होणार्‍या वैयक्तिक पातळीवरील टीकेबद्दल विचारण्यात आले. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानेन. कारण त्यांनी सातत्याने मला टार्गेट केलं त्यामुळे लोकांच्या मनात माझ्यासाठी सहानुभूती तयार झाली. लोकांना असं वाटलं की हे माझ्याशी अन्यायकारक वागत आहेत. हे सगळे पक्ष त्यांचे ट्रोलर्स माशी शिंकली तरीदेखील मला दोषी ठरवायचे, अतिशय असभ्य भाषेत बोलायचे, त्यामुळे सहाजिकच मला सहानुभूती मिळाली”.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, “दुसरं मी यांचे आभार यासाठी मानेल की, यांनी मला लढण्याची ताकद दिली. माझ्या मनामध्ये आपल्याला लढून याला हरवायचंय, यांना त्यांची जागा दाखवायचीय हा विश्वास तयार केला. त्यांच्या त्या वागण्यामुळे मला मानसिक त्रास नक्कीच झाला, पण माझं नुकसान झालं नाही तर उलट फायदाच झाला”, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तीन पक्षांमध्ये समन्वय कसा साधणार?

राज्यात सध्या तीन पक्षांचे सरकार स्थापन झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या तीन पक्षांना सोबत घेऊन जाणं कसं साधलं जाईल? याबद्दल फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “गेल्या अडीच वर्षात आम्ही दाखवून दिले की तीन पक्ष एकत्रित काम करू शकतात आणि वेगाने काम करू शकतात. त्यामुळे आता ते काही नवीन नाहीये. आमच्यात चांगला समन्वय आम्ही करून दाखवू”.

हेही वाचा>> Manoj Jarange : जरांगे विरूद्ध फडणवीस संघर्ष पुन्हा पेटणार? शपथविधी होताच पाटलांचा राज्य सरकारला अल्टिमेटम, म्हणाले…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकीविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, “एका दृढ लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणं चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयात ते अडकलं आहे. मी कालच सरकारी वकिलांशी बोललो की लवकर सुनावणी घेण्यासाठी अर्ज करा आणि कोर्टाला विनंती करा की या संदर्भातील स्टे हटवा. आमचा प्रयत्न असेल की लवकरात लवकर या निवडणुका झाल्या पाहिजेत”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis thanked trollers and critics taking oath as chief minister local bodies elections maharashtra govt rak