तुळापूर या ठिकाणी छत्रपती संभाजी यांच्या समाधी स्थळाचं भूमिपूजन आज करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती. आपल्या भाषणात अजित पवार यांनी संभाजी महाराजांबाबत एक वक्तव्य केलं. ज्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ती चूक लक्षात आणून दिली आणि अजित पवार तातडीने सॉरी म्हणाले.
अजित पवार संभाजी महाराजांबद्दल काय म्हणाले?
“आपले जे आदर्श आहेत, आपले जे महापुरुष होऊन गेले, पुढे इतिहासातमध्ये नवीन पिढीलादेखील त्यांचा इतिहास कळायला हवं. त्यांचं शौर्य काय पद्धतीचं होतं ते समजलं पाहिजे म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय. आज आपण इथे तुळापूरमध्ये स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळ स्मारकाच्या विकासकामाचं भूमीपूजन होत असताना, आपण सगळ्यांनी संभाजी महाराजांच्या आचारविचारांची जपवणूक करण्यासाठी स्मारक बनवतोय. आपल्या सर्वांना हे स्मारक ऊर्जा देत राहील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. इथे वळू आणि तुळापूरमध्ये आपले छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या प्राणाचं फक्त बलिदान दिलं नाही तर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी स्वराज्य रक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याचा आदर्श निर्माण केला”, असं अजित पवार म्हणाले.
हे अजित पवार बोलले आणि…
पुढे अजित पवार म्हणाले, “मी हे सांगू इच्छितो की दर्जेदार अशा प्रकारचं काम या ठिकाणी झालं पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या आयुष्यात एकही निवडणूक हरले नाहीत. अशा प्रकारचा इतिहास आहे. त्यांचं स्मारक आणि वढू-तुळापूरला होतं आहे याचं मला समाधान आहे. तसंच सर्व सहकाऱ्यांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला ते स्मारक प्रेरणादायी राहिल.” हे वाक्य अजित पवारांनी पूर्ण केलं आणि त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी माणूस पाठवला.
पुढे काय घडलं?
देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या माणसाने अजित पवार यांना त्यांच्या भाषणात त्यांनी संभाजी महाराजांबाबत केलेली चूक सांगितली. ज्यावर अजित पवारांनी स्मितहास्य केलं आणि म्हणाले, “सॉरी, राजकारणामुळे मी निवडणूक म्हटलं पण छत्रपती संभाजी महाराज एकही लढाई हरले नाहीत. लोकसभेच्या निवडणुका आल्या आहेत. त्याशिवाय काही कळत नाही, परंतु आमच्यात आमच्यात निष्णात देवेंद्र फडणवीस आहेत. असं काही झालं की लगेच लक्षात आणून देतात. धन्यवाद देवेंद्रजी.. यापुढेही असं काही झालं तर लक्षात आणून द्या. एकही लढाई हरले नाहीत असं मी म्हणायचं होतं. येतानाच आमचं बोलणं चाललं होतं. मला लढाई म्हणणार होतो. मात्र चुकून तो शब्द गेला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.” असं अजित पवार म्हणाले.