येत्या दोन-तीन दिवसांत भाजप नेते देंवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे ‘लोकसत्ता’ने विधानसभा निवडणुक निकालानंतर केलेल्या भाकीतावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर ‘केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र!’, असा नारा राज्यातील भाजप समसर्थकांकडून देण्यात आला होता. दरम्यान, राज्यात भाजपला नेतृत्त्व नाही, असे म्हटले जात असले तरी विधानसभा निवडणुकांची मुख्य जबाबदारी प्रदेशाध्यक्ष म्हणून फडणवीस यांच्याच खांद्यावर होती. त्यामुळे निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर ‘राज्यात देवेंद्र’ ही घोषणा आता प्रत्यक्षात उतरल्याचे दिसत आहे. शुक्रवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपुरात भेट घेतल्याने या शक्यतेला अधिकच बळ मिळाले आहे.
गेले काही दिवस नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री व्हावे, यासाठी माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी मोहीम सुरू केली होती. गडकरी यांचे उघड समर्थन करून व शक्तिप्रदर्शनातून पक्षनेतृत्वावर दबाव आणण्याचे राजकारणही सुरू झाले होते. मात्र, केंद्रीय नेतृत्त्वाने याची दखल न घेतल्याने गडकरी समर्थकांचा जोश हळूहळू मावळला असून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.