राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जपान दौऱ्यावर आहेत. फडणवीस हे या पाच दिवसांच्या जपानच्या दौऱ्यासाठी रविवारी रात्री जपानला रवाना झाले. शासकीय अतिथी (स्टेट गेस्ट) असा दर्जा देत फडणवीस यांना जपान सरकारने आमंत्रित केलं आहे. वर्सोवा-विरार सागरी सेतूसाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीसह (जायका) अन्य वित्तसंस्था आणि जपानमधील आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर फडणवीस यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. फडणवीसांच्या या दौऱ्यात अनेक सामंजस्य करारही होणार आहेत.
जपान सरकारने देवेंद्र फडणवीस यांना शासकीय अतिथी असा दर्जा देत आमंत्रित केल्यानं त्यांचं आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेलं राजकीय महत्व आणि स्थान अधोरेखित झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना २०१३ मध्ये त्यांना असा सन्मान मिळाला होता. त्यानंतर देशातील कोणत्याही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना असा सन्मान मिळाला नाही. अशातच देवेंद्र फडणवीसांच्या चाहत्यांसाठी आणखी एक चांगली बातमी समोर आली आहे. फडणवीस यांना जपानमधील एका विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी दिली आहे.
हे ही वाचा >> कांदा प्रश्नावर मुंडे दिल्लीत, तर फडणवीसांचा जपानहून फोन; महायुतीत श्रेयवादाची लढाई? अजित पवार म्हणाले…
देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट देण्यात येत असल्याची घोषणा जपानमधील कोयासन विद्यापीठाने आज (२२ ऑगस्ट) केली आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवार यांसारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेलं कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न अशा उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे. कोयासन विद्यापीठाचे डीन सोएदा सॅन यांनी ही घोषणा केली. आगामी भारत भेटीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही उपाधी प्रदान करण्यात येईल, असही त्यांनी सांगितलं.