Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates: लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून देश पातळीवर भारतीय जनता पक्षप्रणीत एनडीएला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र, त्याचवेळी महाराष्ट्रात भाजपाला अपेक्षित यश मिळवण्यात अपयश आलं. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची २०१९ च्या २३ जागांवरून ९ जागांपर्यंत पीछेहाट झाली. तसेच, महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचं अपयश हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मोठं भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात अपेक्षित यश न मिळाल्याचं मान्य केलं आहे. तसेच, या पराभवाची संपूर्ण जबाबदारी आपली असल्याचं ते म्हणाले आहेत. “कितीही गणितं मांडली तरी आमच्या जागा कमी आल्या आहेत हे वास्तव मान्य करावं लागेल. या निवडणुकीचं नेतृत्व भाजपाकडून मी करत होतो. त्यामुळे ज्या काही जागा कमी आल्या असतील, त्याची जबाबदारी माझी आहे. मी मान्य करतो की मी स्वत: यात कमी पडलो आहे. ती कमतरता भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“विधानसभा निवडणुकीसाठी पूर्णवेळ काम करायचंय”

“भाजपाला महाराष्ट्रात सामना कराव्या लागलेल्या स्थितीची सगळी जबाबदारी मी स्वीकारत आहे. आता मला विधानसभेत पूर्णवेळ उतरायचं आहे. त्यामुळे मी भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी. त्यानंतर पक्षनेतृत्व जे सांगेल, त्यानुसार मी सगळं करणार आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : फडणवीसांच्या राजीनाम्याच्या विनंतीवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रितिक्रिया

सध्या देवेंद्र फडणवीसांवर महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद व इतर महत्त्वाच्या खात्यांचा कारभार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला या सर्व जबाबदाऱ्यांमधून मोकळं करून राज्यात पक्षाच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी भाजपाच्या नेतृत्वाकडे केली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांच्या जागी कुणाला उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाईल? याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच, फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर फक्त अजित पवार हेच एकमेव उपमुख्यमंत्री राहतील, असंही सांगितलं जात आहे.

काँग्रेसची प्रतिक्रिया

“देवेंद्र फडणवीसांनी भाजपाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी घेतली आहे. त्यांनी महाराष्ट्रात ४५ पारचं गुलाबी स्वप्न रंगवलं होतं. त्यानुसार केंद्रात भाजपानं ४०० पारची घोषणा दिली होती. पण भाजपा निकालांमध्ये तोंडघशी पडली. आता भाजपा त्यांना निवृत्त करतंय की काय, हे पुढे कळेल”, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांच्या विधानावर दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis to step down from deputy chief minister post after loksabha election defeat in maharashtra bjp pmw