Devendra Fadnavis : छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोटमधला पुतळा कोसळल्याने राजकारण चांगलंच पेटलं आहे. या घटनेवरुन सरकावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली. त्यानंतर महाविकास आघाडीने मोर्चा काढला आणि जोडे मारो आंदोलन केलं. या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी एक वाक्य उच्चारलं आणि विरोधकांना आयतं कोलीत हाती मिळालं. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी जे वाक्य उच्चारलं त्यावरुन त्यांना ट्रोल केलं जातं आहे.
आंदोलनाच्या वेळी जोरदार घोषणाबाजी
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान… त्यांचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही, असं म्हणत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असं म्हणत शेकडो कार्यकर्ते गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाले. तसंच गद्दारांना माफी नाही, शिवद्रोहींना माफी नाही अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“मध्य प्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोझरने हटवला. याची माफी काँग्रेस मागणार का? कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा तोडण्यात आला. त्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच काँग्रेसने शिकवलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. छत्रपती शिवरायांनी सूरत लुटलीच नाही. उलट सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने शिकवण दिली की छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली. याची माफी काँग्रेस मागणार का?” ही प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यानंतर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना सोशल मीडियावर तुफान ट्रोल केलं जातं आहे. कोण काय म्हणालं आपण जाणून घेऊ.
खासदार अमोल कोल्हेंनी काय म्हटलंय?
वाटलं होतं जरा विश्रांती घ्यावी… पण इतिहास पुन्हा पुन्हा मांडावाच लागणार..“ मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर” या बहिणाबाईंच्या ओळी इतिहास बदलू पाहणाऱ्यांनासुद्धा लागू होतील अस वाटलं नव्हतं.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
महाराजांनी सूरत लुटले नाही, चुकीचा इतिहास आहे, महाराजांच्या शौर्या वर आक्षेप. हा अक्षम्य गुन्हा आहे..एकदा नाही दोनदा लुटली ..फडणवीस साहेब महाराजांचा अपमान का केलात.
प्रतीक पाटील काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणत आहेत शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही, ही इतिहासाशी लबाडी आहे. शिवाजी महाराजांनी कोणत्याही गोर गरिबांना हात न लावता सुरत एकदा नव्हे दोनदा लुटली आहे फडणवीसांनी असेच बोलत राहावे. विधानसभा निवडणुकीत भाजपला दणका अजून जोरात जनता देईल.
अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होते आहे. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचं गुजरात प्रेम उफाळून आलं आहे अशी टीका महाविकास आघाडीकडून केली जाते आहे. आता याबाबत देवेंद्र फडणवीस काही बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.