२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात असताना भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटे शपथविधी उरकून सरकार स्थापन केले होते. हे सरकार केवळ दिड दिवस टिकलं. परंतु या सर्व राजकारणाची शरद पवारांना माहिती होती असा गौप्यस्फोट नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आमदार रोहित पवारांनी सांगितलं की, “देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यामध्ये काहीच तथ्य नाही.”
रोहित पवार म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी फडणवीस स्वतः माध्यमांसमोर बोलले होते की, राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, त्यांच्यासोबत चर्चादेखील करणार नाही. मग निवडणुकीनंतर राष्ट्रवादी एकत्र येईल असं ते कशाचा आधारावर बोलले. मला वाटतं त्यांची कुठेतरी गल्लत झाली आहे.
रोहित पवार म्हणाले की, शिवसेन फुटली तेव्हा फडणवीस म्हणाले होते की, त्यात त्यांचा काही रोल नाही, परंतु नंतर एकनाथ शिंदे यांनी सत्य सर्वांसमोर मांडलं आणि नंतर फडणवीसांनी देखील ते मान्य केलं. फडणवीसांसारख्या मोठ्या नेत्याची अशी दुटप्पी भूमिका नेहमी पुढे का येते याचं मला आश्यर्य वाटतं.
हे ही वाचा >> “सत्यजीत तुझं अपक्ष किती दिवस टिकतं ते पाहू”, बाळासाहेब थोरात यांचे सत्यजित तांबे यांच्याबाबत सूचक वक्तव्य
“शिंदे गटाचा फायदा होणार नाही म्हणून…”
रोहित पवार म्हणाले की, अलिकडेच देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला होता की, महाविकास आघाडीतले नेते त्यांच्याविरोधात कारवाई करणार आहेत, परंतु त्यात काही तथ्य नाही. ते सध्या केवळ लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. फडणवीस असं करत आहेत कारण त्यांना समजलं आहे की, आगामी निवडणुकीत त्यांना शिंदे गटाचा फायदा होणार नाही. म्हणून ते लाकांची सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.