स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने नव्या संसदेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळेच विरोधकांनी सोहळ्यावर बहिष्कार घातल्याचे दावेही सत्ताधारी भाजपाच्या नेतेमंडळींकडून करण्यात आला. त्यापाठोपाठ दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात सावरकर जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा पुतळा हटवल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी रणदीप हुड्डाच्या आगामी चित्रपटाचा टीजर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
काय आहे ट्वीटमध्ये?
देवेंद्र फडणवीसांनी ‘सावरकर’ या सिनेमाचा टीजर आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. “रणदीप हुड्डाची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘सावरकर’ या चित्रपटाचा टीझर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४०व्या जयंतीनिमित्ताने लाँच करण्यात आला. वीर सावरकर हे भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी होते, ज्यांनी ब्रिटिश राजवटीविरोधात सशस्त्र क्रांतीला प्रेरणा दिली. ‘सावरकर’ लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे”, असं या ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीसांनी नमूद केलं आहे.
“महात्मा गांधी वाईट नव्हते, पण…”
रणदीप हुड्डानं या चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या टीजरमध्ये ‘दी मोस्ट वाँटेड इंडियन बाय ब्रिटिश’, असा सावरकरांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, “महात्मा गांधी वाईट नव्हते. पण जर त्यांनी त्यांचा अहिंसेचा हट्ट सोडून दिला असता, तर भारत ३५ वर्षांपूर्वीच स्वतंत्र झाला असता”, असा संवाद सावरकरांच्या तोंडी दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचा विषय आणि सावरकरांच्या मुद्द्यावरून देशात निर्माण झालेल्या राजकीय सुंदोपसुंदीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपटदेखील वादात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याआधी ‘द कश्मीर फाईल्स’ आणि ‘द केरला स्टोरी’ या दोन चित्रपटांवरून गेल्या वर्षभरात मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं.