मुख्यमंत्र्यांचा आज भूम तालुक्यात दौरा; भूजल सर्वेक्षण विभागाकडून रातोरात काम
रात्री अचानक बोअरवेलच्या गाडीचा जोरात आवाज सुरू झाला. दोन दिवसांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांची वर्दळ वाढली होती. त्यात हे नवीन काय म्हणून गावकरी बाहेर येऊन पाहू लागले. मुख्यमंत्री ज्या मार्गावरून दुष्काळ पाहणीदौरा करणार आहेत, तेथील नदीपात्रात रिचार्ज शाफ्ट घेण्याचा कार्यक्रम रात्रीतून सुरू करण्यात आला होता. ‘मुख्यमंत्री येती दारा’ म्हणजे नेमके काय, याचा प्रत्यय पुन्हा एकदा भूम तालुक्यातील हिवरा ग्रामस्थांनी घेतला.
शनिवार, १३ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा भूम तालुक्यात दौरा करीत आहेत. मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे रस्त्यांची डागडुजी, शासकीय निवासस्थानांची रंगरंगोटी आणि सरकारी बाबूंची धावपळ याचा प्रत्यय सर्वानाच आहे. या दौऱ्यात भूम तालुक्यातील छोटय़ा-मोठय़ा गावातील नागरिकांना ही लगबग गुरुवार आणि शुक्रवारी पाहता आली. मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा ज्या मार्गावरून जाणार आहे तेथे जलयुक्त शिवार आणि रोजगार हमी योजनेच्या अनियमिततेची आरडाओरड झाली. त्यावर पांघरुण घालण्यासाठी भूजल सव्रेक्षण विभागाने तत्परतेने एका रात्रीतून ओढे, नाले आणि नदीपात्रांमध्ये शंभर फूट खोलीचे रिचार्ज शाफ्ट घेतले. शेजारी असलेल्या जुन्या रिचार्ज शाफ्टची अवस्था केवळ निगराणी न ठेवल्याने बिकट झाली आहे. हिवरा येथील नदीपात्रात तीन वर्षांपूर्वी खोलीकरण आणि रुंदीकरणाचे जलयुक्तचे काम करण्यात आले. ते काम आता असून नसल्यासारखे आहे. यानिमित्ताने गवताची साफसफाई मात्र जोरात सुरू आहे.
भूम तालुक्यात कृषी विभागाला ३३७ शेततळ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र ४५ शेततळी पूर्ण झाली आहेत. तालुक्यात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून समाधानकारक काम झाले आहे. ते काम कृषी विभागाकडून झाले असल्याचे भासविण्याचा प्रकार सध्या सुरू आहे.
जलयुक्त आणि रोजगार हमीचे एकही काम तालुक्यात सुरू नाही. मोजक्या कामांवर रात्रंदिवस जेसीबी आणि पोकलेनचा आवाज काम सुरू असल्याची साक्ष देण्यासाठी पुरेसा आहे. हीच कामे मुख्यमंत्री फडणवीस यांना दाखविणार काय, अशी विचारणा तालुका कृषी अधिकारी दुरंदे यांच्याकडे केली असता, ‘सध्या कामात आहे, दोन दिवसांनंतर दौरा संपल्यानंतर पूर्ण माहिती देतो,’ असे सांगून त्यांनी अंगावर आलेली वेळ झटकून देण्याचा प्रयत्न केला.
हिवरा गावचे उपसरपंच बाळासाहेब जगदाळे यांनी गावात जुन्या कामाचीच साफसफाई सुरू असल्याचे सांगितले. भूम येथील अनिल शेंडगे यांनी जुन्याच कामांना मुलामा देऊन हा दौरा उरकण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांची लगीनघाई सुरू असल्याचा आरोप केला.