फडणवीस यांचा इस्लामपूर दौरा; भेटीने राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्लामपूर दौऱ्यात पक्षाच्या निष्ठावंतांना गौण स्थान देत शासनाच्या ध्येयधोरणावरून विधिमंडळात कडाडून हल्ला चढविणारे राष्ट्रवादीचे गटनेते आमदार जयंत पाटील यांच्याशी सुमारे तीस मिनिटे बंद दरवाजाआड चर्चा केली. राजारामबापू उद्योग आणि शिक्षण समूहाच्या कार्याची माहिती असे जरी या भेटीमागचे कारण दाखवले तरी त्यात राखलेल्या गुप्ततेने अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा सांगली दौरा हा पक्षाचा मेळावा, सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा विवाह या दोन मुख्य कार्यक्रमांसाठी आयोजित केला होता. जिल्हय़ातील तसेच त्यांच्यासोबत आलेल्या मंत्रिगण आणि पदाधिकाऱ्यांना या दोन कार्यक्रमांचीच कल्पना होती. पण अचानकपणे या दौऱ्यात बदल करत मुख्यमंत्र्यांनी काल राजारामबापू उद्योग समूहास भेट दिली. या भेटीवेळी त्यांनी या उद्योग समूहाने केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करतानाच तासभर त्यांची आ. जयंत पाटील यांच्यासमवेत गुप्त बैठक पार पडली. या वेळी त्यांच्यासमवेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते. या वेळी नेमकी काय चर्चा झाली याची माहिती दोघांनीही दिली नाही. या भेटीवेळी सोबत अनेक मंत्रिगण, पक्ष पदाधिकारी असतानाही त्यांना दूर ठेवण्यात आले. या गुप्त बैठकीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
खरेतर आगामी नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात मोच्रेबांधणी होईल अशी अपेक्षा होती. परंतु या सर्वाऐवजी मुख्यमंत्र्यांनी राजारामबापू उद्योग समूहास जास्त वेळ दिला, तसेच या भेटीनंतर त्यांच्याबरोबर गुप्त चर्चा केल्याने याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.