देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता, असा दावा उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या वादाला तोंड फुटले. २०१९ साली अमित शाह यांच्या मातोश्री भेटीत काय काय झाले? यावर दोन्ही बाजूंनी अनेकदा भाष्य करण्यात आले आहे. वेळोवेळी गौप्यस्फोटही करण्यात येतात. मात्र उद्धव ठाकरेंनी अमित शाहांच्या शब्दानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी आदित्यला मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता, असा नवा दावा केला आहे. त्यावरून उबाठा गट आणि भाजपा पुन्हा आमने-सामने आले आहेत. द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा दावा केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात घेतलेल्या प्रचारसभेत त्यावर सविस्तर भाष्य केले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री होते. तेव्हा आदित्यने विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. फडणवीस मला म्हणाले की, आदित्यला मी चांगला तयार करतो. अडीच वर्षानंतर त्याला आपण मुख्यमंत्री करू. मी त्यावेळीच त्यांचा विरोध केला. आदित्य लहान आहे, त्याच्या डोक्यात हे घालू नका, असे सांगितले. पण आदित्यला जर मुख्यमंत्री केले, तर तुम्ही इतके ज्येष्ठ नेते त्याच्या हाताखाली काम कसे करणार? असा प्रश्न मी विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले की, अडीच वर्षानंतर मी दिल्लीत जाणार. मला अर्थखात्यातले जरा कळते. “याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जाऊन अर्थखाते पाहण्यात रस होता”, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, भाजपाच्या विरोधात रान पेटले आहे. भाजपाच्या नेत्यांना गावागावत बंदी झाली आहे. अशोक चव्हाण यांना गावात प्रचारासाठीही येऊ दिले जात नाही. आता अशोक चव्हाण वाटत असेल की, काँग्रेसमध्ये असतान साधी विचारपूस होत होती. आता फक्त घामच पुसावा लागतो.
देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना कुठल्यातरी खोलीत घेऊन गेल्याचा उल्लेख केला होता. हा उल्लेख उद्धव ठाकरेंना चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसले. यावर पलटवार करताना ते म्हणाले की, तुम्ही ज्याला कुठली तरी खोली म्हणत आहात, ते आमच्यासाठी मातोश्रीमधील मंदिर आहे. ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खोली आहे. जिथे अमित शाह बाळासाहेबांच्या फोटोसमोर नाक रगडायला आले होते. त्या खोलीत अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी येऊन गेले होते. तुम्ही कोणकोणत्या खोलीत जाऊन काय काय करता? हे आम्ही कधी बघायला येत नाही. पण तुम्ही तुमच्या विचारांची खोली नक्कीच दाखवून दिली.