गेली ५ दशकं मराठी आणि हिंदुत्वावर हुंकार काढणारी शिवसेना गेल्या तीन महिन्यांपासून संकटांचा सामना करत आहे. शिवसेनेत ४० आमदारांनी बंड केल्यानंतर आता पक्षावरच दावा करण्यात आला आहे. हा सर्व वाद आता निवडणूक आयोगाच्या समोर सुरु आहे. त्यात निवडणूक आयोगाने शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ आणि पक्षाच नाव गोठवलं आहे.
‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांना चिन्ह गोठवण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचं सांगत त्यांच्यावर टीका केली आहे. यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट करत शिवसेनेला टोला लगावला आहे.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का कोणता आहे, असा सवाल उपस्थित करत अमृता फडणवीसांनी काही पर्याय दिले आहेत. पहिला ‘धनुष्यबाण’ चिन्ह गेल्याने, ४० आमदार आणि १२ खासदारांनी साथ सोडल्याने, भाजपाशी असलेले संबंध तुटणे आणि अखेरचा हिंदुत्ववादी पक्षाची प्रतिमा पुसणे, असे पर्याय अमृता फडणवीस यांनी दिले आहेत. त्यांच्या ट्विटला आता शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर मिळतं पहावे लागणार आहे.
दरम्यान, अमृता फडणवीसांनी यापूर्वी सुद्धा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्ला केला आहे. तेव्हा त्यांना शिवसेनेकडूनही उत्तर देण्यात आलं. मात्र, आता अमृता फडणवीस यांच्या ट्विटने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.