नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी काल (मंगळवारी) दिल्लीत महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरही चर्चा होईल, असंही सांगितलं जात होतं. दरम्यान, या बैठकीत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव अमान्य केल्याचं पुढे आलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदी कायम राहणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.
हेही वाचा – “माझी भाजपाच्या नेतृत्वाला हात जोडून विनंती आहे; त्यांनी फडणवीसांना…”; अनिल देशमुखांचं विधान चर्चेत!
दिल्लीत झालेल्या या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाचा पराभव झाला असला, तरी राज्यातील नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही, असं पियूष गोयल यांनी सांगितलं. तसेच आगामी विधानसभा आम्ही आणखी जोमाने लढू असेही ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनीही या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली. महाराष्ट्र कोअर टीमची केंद्रीय नेतृत्वासोबत बैठक पार पडली असून यावेळी राज्यातील निकालांवर चर्चा झाली, असे ते म्हणाले. तसेच महायुती आणि मविआमधील मतांमध्ये केवळ ०.३ टक्क्यांचाच फरक असून आम्हाला कुठे मते कमी पडली, या विषयावर चर्चा झाली, असेही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा – वसईत तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भक्कम पुराव्यानिशी…”
पुढे बोलताना, यावेळी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या आधीच्या आमच्या रणनीतीवर चर्चा केली असून त्यानुसार आम्ही एनडीएतील घटक पक्षांसोबत विधानसभेच्या चर्चा करू आणि भाजपा पूर्ण ताकदीने विजयासाठी प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.