एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिल्यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय, महाविकासआघाडी यावर काय निर्णय घेणार याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे. कारण, महाविकास आघाडीतील अन्य प्रमुख पक्षांपैकी शिवसेना देखील एक आहे. दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेला टोला देखील लगावला आहे.
“ भाजपाला हरवण्यासाठी सगळे एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कोणीही एकत्र आलं तरीही भारतातली जनता, महाराष्ट्रातील जनता ही मोदींच्या पाठीशी आहे आणि ती भाजपालाच निवडून देईल. फक्त आता या सगळ्या आघाडीमध्ये शिवसेना काय करणार? याकडे आमचं लक्ष असेल.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
राज्यात नवी समीकरणं जुळणार? एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिली ‘ही’ ऑफर!
तसेच “ एमआयएमला भाजपाची बी टीम बोललं जात होतं, परंतु आता त्यांच्याशी युती करण्याचं बोललं जात आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ते हारले की त्यांना ईव्हीएम दिसतं, बी टीम दिसते. हरल्यानंतर अशा अनेक गोष्टी ते बोलत असतात. त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नसते.”
याचबरोबर “आम्ही पाहतो आहोत की सत्तेसाठी ते आणखी काय करतात? तसंही आता शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे आणि अजानची स्पर्धा वैगरे सुरू आहे, त्याचा परिणाम आहे का पाहूयात. ” असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
याशिवाय, “ एमआयएम जर त्यांच्याशी जुडत असेल तर आम्हाला काही फरकत पडत नाही. याचं कारण लोकांचा विश्वास मोदींवर आहे. लोक मोदींना पाहून आम्हाला मतदान करतात. आमच्या कामाला पाहून मतदान करतात. त्यामुळे ते सर्वजण एकत्रित आले तरी आम्हाला फरक पडत नाही. त्यामुळेच पाहायचं आहे की शिवसेना आणि एमआयएम कशाप्रकारे सोबत येतात.” असंही देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवलं.