स्मार्ट सिटीबाबत स्थानिक स्वराज संस्थांच्या अधिकारावर गदा येणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
स्मार्ट सिटीवरून विरोधकांसह शिवसेना आक्रमक असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सरकार स्थानिक स्वराज संस्थांच्या अधिकारात हस्तक्षेप करणार नसल्याची ग्वाही दिली. स्मार्ट सिटी निधीच्या विनियोगासाठी केंद्र किंवा राज्य सरकार कंपनी (एसपीव्ही) स्थापन करणार नसून ते अधिकार महापालिकेलाच असतील. पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेल राबविले, तर खासगी कंपन्यांना किती प्रतिनिधित्व द्यायचे, याचेही अधिकार अधिकार त्यांच्याकडेच राहतील, असे फडणवीस यांनी विधानसभेत सोमवारी नि:संदिग्धपणे स्पष्ट केले. सर्व राजकीय पक्षांना व स्थानिक स्वराज्य संस्थांना बरोबर घेऊनच पुढे जाणार असल्याचे सांगून त्यांनी वादावर पडदा टाकला.
स्मार्ट सिटीवरून सोमवारी दिवसभर विधानसभा सभागृहात व बाहेरही वादंग झाले. केंद्र सरकार खासगी कंपनी स्थापन करणार आणि महापालिका व लोकप्रतिनिधींना कोणतेही अधिकार राहणार नाहीत, असा समज पसरल्याने शिवसेनेचे सुनील प्रभू यांच्यासह काहींनी त्यास जोरदार विरोध केला. कंपनी स्थापन करणे ऐच्छिक ठेवावे, लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्राच्या १० ऐवजी १३ शहरांची निवड व्हावी आणि नांदेड, िपपरी-चिंचवड व उल्हासनगर या वगळलेल्या शहरांचा त्यात समावेश करावा. त्याचबरोबर सवा कोटी लोकसंख्येच्या मुंबईसाठी दरवर्षी केवळ ९६ लाख रुपये ही केवळ चेष्टा असून केंद्र सरकारने किमान १० हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. विरोधकांनी व शिवसेनेने उपस्थित केलेल्या अनेक मुद्दय़ांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर विवेचन केले. स्थानिक स्वराज्य संस्थेचे कोणतेही अधिकार केंद्र सरकार काढणार नाही. कंपनी महापालिकेनेच स्थापन करायची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. नवी मुंबईने स्मार्ट सिटीत समावेश करण्यास विरोध केल्याने त्याऐवजी पिंपरी-चिंचवडचा समावेश करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.
स्मार्ट सिटी योजनेबाबत असलेले गरसमज दूर करण्यासाठी मी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांशी चर्चा केली असून सर्वाना बरोबर घेऊनच पावले टाकणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा