आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती होणार की, नाही याविषयी संभ्रम कायम असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यात मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात अटल संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. मित्र पक्षांनी साथ दिल्यास त्यांचे खासदार निवडून दिल्लीत पाठवू पण त्यांनी साथ दिली नाही तर मावळ आणि शिरुरमधून आमचे उमदेवार उभे करु असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सध्या मावळ आणि शिरुरमध्ये शिवसेनेचे खासदार आहेत. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघावर दावा करण्यासाठी अटल संकल्प महासंमेलन नाहीय असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असले तरी शिवसेनेच्या मतदारसंघात शक्तीप्रदर्शन करण्याची संधी भाजपाने यानिमित्ताने साधली.

मोदींना पाठींबा देणाऱ्या मित्रपक्षाचा खासदार निवडूण आणू. पण मित्र पक्षांनी साथ न दिल्यास संसदेत भाजपाचेच खासदार जातील. लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे हे आमचे उमेदवार असतील असे मुख्यमंत्री म्हणाले. काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमातही शिवसेना-भाजपा युती होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता.