त्रिपुरामध्ये घडलेल्या कथित घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. मात्र, या मोर्चांना हिंसक वळण लागलं आणि त्यावरून राज्यात मोठी चर्चा सुरू झाली. अमरावतीमध्ये घडलेला प्रकार म्हणजे षडयंत्र होतं, अशी प्रतक्रिया दिल्यानंतर आज राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती प्रकरणावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच, नवाब मलिक यांना हे सगळं माहिती होतं, असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे. भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना फडणवीसांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर आरोप केले आहेत.

“नवाब मलिक यांना संपूर्ण कल्पना”

अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचारावरून देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “हे षडयंत्र उघड होऊ नये, म्हणून नवाब मलिक यांनी कव्हर फायरिंग करण्यासाठी विधानं केली आहेत. या शहरांमध्ये हे मोर्चे अचानक काढण्यासाठी कुठून कुठून फंडिंग झालं, ते कुणी कुणी दिलं याची संपूर्ण कल्पना नवाब मलिक यांना आहे”, असं फडणवीस म्हणाले.

“आमच्या कार्यकर्त्यांना अमरावतीमधून अटक केली. अमरावतीमध्ये एसआरपीच्या ७ कंपन्या होत्या. हा मोर्चा निघाला, तोडफोड सुरू झाली, तेव्हा आधी त्यांना आदेशच दिले नाहीत. त्यानंतर हाताबाहेर गोष्टी गेल्यानंतर त्यांना आदेश दिले. त्यांच्यावर हल्ला झाला. पॅटर्न बघा. आझाद मैदानावर जेव्हा अशाच प्रकारची घटना झाली, तेव्हा पोलीसच जखमी झाले. तीच परिस्थिती आता आहे. एसआरपीच्या ५ जवानांवर गोटे मारले गेले. त्यांना गंभीर जखमी करणारे कोण होते? अचानक कोल्हापुरी गेट, नागपुरी गेट या ठिकाणी इतके टोकदार गोटे आले कुठून? एसआरपीच्या पोलीस जवानांवर हल्ला झाल्यानंतर, त्यांना जखमी केल्यानंतर एका माणसालाही अटक झालेली नाही. पोलीस मार खाण्यासाठी आहेत का? ठरवून पोलिसांवर हल्ला करण्यात आला आहे”, असं देखील फडणवीस म्हणाले.

“…तर जनता रस्त्यावर उतरू देणार नाही”

“भाजपाचा कार्यकर्ता कधीही दंगल करणार नाही. आम्ही कधीच निष्पापांवर हल्ला करणार नाही. पण आमच्या अंगावर कुणी चालून आलं, तर त्याला सोडणार देखील नाही. कुणाला वाटत असेल की आमचं सरकार आहे म्हणून आम्ही असे मोर्चे काढून हिंदूंची दुकानं जाळू, हे आम्ही आता होऊ देणार नाही. यावर सरकारनं कारवाई केली नाही, तर जनता रस्त्यावर उतरू देणार नाही. सरकार गप्प बसत असेल, आशीर्वाद देत असेल, तर अशा घटना घडणार आहेत”, अशा शब्दांत फडणवीसांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

Story img Loader