केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे देशात मोठे नेते असले तरी स्वत:च्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात मात्र कर्तृत्वशून्य आहेत. अशा कर्तृत्वशून्य नेत्याला सोलापूरच्या मतदारांनी घरी बसवावे आणि क्रांती घडवावी, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अॅड. शरद बनसोडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा येथे आयोजिलेल्या जाहीर सभेत फडणवीस हे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर पक्षाचे उमेदवार शरद बनसोडे यांच्यासह आमदार प्रकाश शेंडगे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवसेना तालुकाप्रमुख येताळा भगत, भाजपचे तालुकाध्यक्ष शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.
या वेळी फडणवीस यांनी देशासमोरील प्रश्नांसह स्थानिक विकासाच्या प्रश्नांवर चर्चा उपस्थित केली. मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न काँग्रेस व राष्ट्रवादीवाल्यांनी तसाच लोंबकळत ठेवला व शेतक-यांनाही तसेच झुलवत ठेवले. त्यामुळे       शेतक-यांच्या शेतात पाणी आले नसून तर शेतक-यांच्या डोळय़ांत पाणी आले आहे. या पाण्याची किंमत चुकवावी लागेल, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेस आघाडी सरकारच्या राजवटीत देशाची सीमा सुरक्षित राहिली नसून देशाची अंतर्बाहय़ सुरक्षाच धोक्यात आली आहे. सीमेवर वारंवार होणा-या चकमकींमुळे देशाचे जवान मोठय़ा संख्येने शहीद होता आहेत. काँग्रेसच्या पुळचट नेतृत्वामुळे देशाची अधोगती झाली असून ही परिस्थिती बदलण्यासाठी देशाची सूत्रे नरेंद्र मोदी यांच्या हाती सोपविण्याची गरज आहे. त्यासाठी मतदारांनी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी आमदार प्रकाश शेंडगे यांनी देशात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यास सर्वप्रथम धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा बहाल केला जाईल, अशी ग्वाही दिली. या वेळी येताळा भगत, शशिकांत चव्हाण, रमेश जोशी, दत्तात्रेय जमदाडे आदींची भाषणे झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा