काँग्रेसचे माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीतील काही आजी-माजी नेतेही पक्षांतराच्या विचाराप्रत आले आहेत. मुंबईत त्या दृष्टीने चर्चा-खलबते सुरू असल्याची माहिती येथे मिळाली. दरम्यान, खतगावकर यांनी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने त्यांचा भाजप प्रवेश नक्की मानला जात आहे.
नांदेडातील राजकीय उलथापालथीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस नेते खासदार अशोक चव्हाण सोमवारी येथे आले होते. खतगावकरांनी पक्ष सोडल्यास होणाऱ्या राजकीय परिणामांचा त्यांनी अंदाज घेतला. याच वेळी राष्ट्रवादीतही मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तविली. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत तशाच घटना-घडामोडी सुरू आहेत. दीड वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश करणारे माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या शिवसेना प्रवेशाची जोरदार चर्चा असताना या पक्षाच्या नेत्या सूर्यकांता पाटील, तसेच आता या पक्षात नसलेले माजी मंत्री डॉ. माधव किन्हाळकर यांची नावेही समोर आली आहेत.
पाटील यांना पक्षाने, विशेषत: नवनेतृत्वाने अक्षरश: वाळीत टाकले. विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून त्यांचे नाव आधी निश्चित केले व नंतर कापल्याने त्यांनी गेल्या दीड-दोन महिन्यात पक्षाशी संबंध तोडल्याचे दिसत होते. दोन आठवडय़ांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नांदेड-हिंगोली जिल्ह्य़ात पक्ष मेळाव्यासाठी आले; पण त्यांच्या कार्यक्रमांवर सूर्यकांता पाटल यांनी अघोषित बंदी टाकत त्याच वेळी मुंबईला प्रयाण केले. अलीकडे त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले असले तरी त्या डॉ. किन्हाळकरांसोबत वेगळ्या राजकीय निर्णयाच्या तयारीत असल्याचे समजते. मात्र, या नेत्यांनी आपल्या हालचालींबद्दल अत्यंत गोपनीयता बाळगली आहे.
नांदेडात अशोक चव्हाण यांच्या राजकीय साम्राज्याला हादरा देण्यासाठी सर्वचजण एकत्र येऊ शकतात, असे भाजपच्या पदाधिकाऱ्याने बुधवारी येथे सांगितले. प्रस्तुत प्रतिनिधीने मध्यंतरी डॉ. किन्हाळकरांशी संपर्क साधला असता ‘भाजपत प्रवेश करणार असल्याची बाब विचाराधीन नाही. पण तसा प्रस्ताव आला तर विचार करून निर्णय घ्यावा लागेल’, असे म्हटले होते. आता भाजपच्या वाटेवर असलेले खतगावकर वरील सर्वानी एका प्रवाहात यावे, अशा प्रयत्नात असल्याचे समजते. या नेत्यांनी सामूहिक निर्णय घेतल्यास नांदेड जिल्ह्य़ात महायुतीला मोठे बळ मिळेल, असे सांगितले जाते.
दरम्यान, भाजपचे माजी खासदार डी. बी. पाटील यांनी खतगावकरांच्या भाजप प्रवेशाला अनुकूलता दर्शविली आहे. खतगावकर यांच्या विरोधात भाजपतील काही असंतुष्टांनी प्रदेशाध्यक्षांना पाठविलेल्या पत्रावर डी. बी. पाटील यांचे नाव टाकून सहीदेखील केली होती. त्यावर डी. बी. पाटील यांनी हरकत घेत नापसंती व्यक्त केली, असे समजते.

Story img Loader