राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या अर्थसंकल्पीय सत्राचा आजपासून दुसरा आठवडा सुरू झाला. गेल्या दोन दिवसांत राज्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवसाची सुरुवात विरोधकांच्या आक्रमक मागणीने झाली. अवकाळीच्या नुकसानावर दुपारनंतर सविस्तर निवेदन करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितलं. मात्र, एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं असताना दुसरीकडे दोन्ही बाजूच्या सदस्यांमद्ये हलक्याफुलक्या वातावरणात मिश्किल संवाद झाल्याचंही पाहायला मिळालं.
नेमकं काय घडलं?
आजपासून अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली असून याच आठवड्यात अर्थसंकल्पही मांडला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर या आठवड्यात दोन्ही बाजूचे सदस्य आक्रमक झाल्याचं पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आज मात्र जमीन गैरव्यवहार प्रकरणावर सभागृहात चर्चा चालू असताना दोन्ही बाजूच्या सदस्यांनी एकमेकांना चिमटे काढल्याचं दिसून आलं.
समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आज विधानसभेत हिंदू देवस्थान आणि वक्फ बोर्डाच्या जमिनींच्या बाबतीत गैरव्यवहार घडत असल्याचा आरोप करून त्यावर वक्फ कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल का? असा सवाल सरकारला केला. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी “याचा तपास नक्कीच केला जाईल. वक्फ कायद्यानुसार कारवाईची गरज असेल, तर तशा सूचना दिल्या जातील”, अशी प्रतिक्रिया दिली.
दिलीप वळसे पाटलांचे प्रश्न
दरम्यान, यावर बोलताना माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी आक्षेप घेतला. “गृहमंत्र्यांना लवकर चौकशी संपवा वगैरे सूचना देता येत नाहीत असं म्हणणं मला पटलेलं नाही. हा अतिशय मोठा घोटाळा आहे. त्यामध्ये अनेक लोक गुंतलेले आहेत. याची चौकशी सध्या भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून चालू आहे. माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही यासंदर्भात वेळेत चौकशी पूर्ण करणार का? यातल्या लोकांची नावं उघड करणार का?” असे प्रश्न वळसे पाटील यांनी केले.
जयंत पाटलांचा फडणवीसांना चिमटा आणि सभागृहात हशा!
दरम्यान, यावर फडणवीस बोलायला उभे राहताच जयंत पाटलांनी त्यांना शाब्दिक चिमटा काढला. “तुम्ही आज आक्रमक दिसत नाहीत. चिडलेले दिसत नाहीत. एवढा घोटाळा समोर मांडला जाऊनही तुमच्या चेहऱ्यावर राग दिसत नाही.तुम्हाला राग आलेला नाही”, असं जयंत पाटील समोरच्या बाकावर बसल्याबसल्याच म्हणाले. त्यावर फडणवीसांनी मिश्किलपणे “मला राग येतच नाही जयंतराव” असं म्हणताच सभागृहात हशा पिकला!
“आम्ही म्हणालो होतो की बदला घेऊ, आता आमचा बदला हा आहे की..”, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!
यानंतरही जयंत पाटील यांनी थेट विधानसभा अध्यक्षांना मिश्किलपणे विनंती करत “याची नोंद घेतली जावी”, अशी टिप्पणी केली. त्यावर समोर बसलेले विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीसांच्या कालच्या वक्तव्याचा संदर्भ घेत “राग नाही, ते आता बदला म्हणून सगळ्यांना माफ करत सुटलेत”, असा टोला लगावताच सभागृहात पुन्हा हशा पिकला!
फडणवीसांचं ‘ते’ विधान आणि अजित पवारांचा टोला!
मंगळवारी धुळवडीच्या कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी “आम्ही मागे सभागृहात म्हणालो होतो की या सगळ्याचा बदला घेऊ. आता (सत्तेत आल्यानंतर) आमचा बदला हाच आहे की आम्ही या सगळ्यांना माफ केलं”, अशी टिप्पणी केली होती. त्यावरून अजित पवारांनी आज फडणवीसांनी खोचक टोला लगावला.