मंदार लोहोकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पंढरपूर : संत ज्ञानोबा – तुकाराम महाराजांचा जयघोष आणि टाळ मृदंगांचा गजर करत राज्यभरातून आलेल्या संतांच्या पालख्यांचा सोहळा शनिवारी पंढरी नगरीत विसावला. वैष्णवांच्या या वारीसोबत पावसाच्या संततधारेनेही जोड दिल्याने पंढरी नगरी भक्तिसागरात चिंब झाली. गेली दोन वर्षे करोनामुळे सुनी सुनी झालेली पंढरी नगरी पुन्हा टाळ मृदंग, भजन, कीर्तन आणि भाविकांच्या गर्दीने फुलून गेली. जवळपास १० लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.

शनिवारी दुपारीच विठ्ठलाच्या दर्शनाची रांग दूरवर पोचली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या वाखरी येथे मुक्कामी होत्या. शनिवारी दुपारी वाखरी येथे रिंगण सोहळा झाला. या वेळी पावसाची संततधार सुरू होती. त्यानंतर संत मुक्ताई आणि संत नामदेव महाराज यांच्यासह मानाच्या पालख्या वाखरी येथे दाखल झाल्या. सर्व संतांची भेट झाली. त्यानंतर क्रमाक्रमाने पालख्या पंढरीकडे मार्गस्थ झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरीहून पुढे आल्यावर भाते यांच्या रथातून पुढे आली. पंढरपूरच्या जवळ आल्यावर सरदार शितोळे यांच्या गळय़ात माउलीच्या पादुका घालण्यात आल्या. या वेळी भर पावसात हजारो भाविकांनी या सर्व पालख्यांचे मोठय़ा उत्साहात स्वागत केले.

 वाखरीच्या रिंगण सोहळय़ासाठी पंढरपूरहून भाविक जातात. ज्या भाविकांना पालखी सोहळय़ात जाता येत नाही असे  काही भाविक वाखरी ते पंढरपूर पायी चालत येतात. पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने शहरात येणाऱ्या सर्व संतांच्या पालख्यांचे स्वागत करण्यात आले. संतांच्या पादुका आपआपल्या मंदिरात विसावल्या आहेत. टाळ-मृदंग आणि ग्यानबा तुकारामच्या जयघोषात पंढरी नागरी दुमदुमून गेली आहे. आता भाविकांना सावळय़ा विठुरायाच्या दर्शनासाठी ‘भेटी लागे जीवा लागलीसे आस’ याप्रमाणे विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे.

 ‘पावलो पंढरी पार नाही सुखा, भेटला हा सखा मायबाप’ या अभंगाप्रमाणे भाविकांची विठ्ठल दर्शनाची तृष्णा पूर्ण होत आहे. गेली दोन वर्षे करोनामुळे आपल्याच घरी राहून विठ्ठलभक्ती करीत वारकरी संप्रदायाने सहिष्णुतेची शिकवण दिली. मात्र आता करोनाचा संसर्ग कमी झाल्याने यंदा साऱ्यांचीच शरीर-मने यंदा पंढरीच्या दिशेने धावली आहेत. शेकडो मैल पायी चालत हे लाखो भाविक पंढरीत विसावले आहेत.

पंढरीतील मठ, धर्मशाळा, लॉज, मोकळे पटांगण जिथे जागा मिळेल तिथे भाविकांच्या राहुटय़ा, तंबू, पाहावयास मिळत आहेत. तसेच शहरातील मंदिर परिसर, प्रमुख रस्त्यावर भाविकांची वर्दळ आहे. सर्वत्र भजन, कीर्तन , हरिनामाच्या गजराने नगरी दुमदुमून निघाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज महापूजा

 रविवारी (दि. १०) पहाटे शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. यासोबतच अन्य दोन कार्यक्रम तसेच शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. मात्र राज्यातील नगरपालिका निवडणुकीमुळे आचारसंहिता जाहीर झाली असल्याने मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याबाबत प्रश्नचिन्ह  होते. यासाठी प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. यावर दौऱ्याला आयोगाकडून परवानगी मिळाली आहे.

चंद्रभागा पैलतीरावर भाविक विसावले.. 

मंदिर समितीने दर्शनरांगेतील भाविकांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून निवारा तयार केला आहे. याशिवाय आरोग्य , पिण्याचे पाणी , न्याहारी दिली जात असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेत भाविक आहेत. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जिल्हा पोलिसांचा बंदोबस्त तसेच गर्दीच्या ठिकाणी ‘माउली पथक’ पोलीस प्रशासनाने तैनात केले आहे.