लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे पादुका दर्शन घेण्यासाठी लोणंदनगरीत वारकरी आणि भाविकांची मांदियाळी झाली आहे. माऊली माऊलींच्या नामघोषात टाळ मृदंगाच्या गजरात भाविकांचा मेळा भरला आहे. जणू काही भाविकांच्या भक्तीचा महापूरच लोटल्या सारखी गर्दी झाली आहे.
माऊलीच्या दर्शनासाठी लोणंदच्या पालखी तळावरून पुर्व व पश्चिम दोन्ही बाजूला भविकांच्या लांबलचक दर्शनरांगा लागल्या होत्या. माऊलींच्या दोन दिवसाच्या मुकामात संपूर्ण लोणंद नगरी हरिनामाच्या गजराने दुमदुमुन गेली होती. माउलीच्या सोहळ्याच्या आगमनाने लोणंद नगरीला पंढरीचे स्वरुप येवून लोणंदच पंढरी झाल्याचा भास होतो आहे. भाविकांच्या दर्शनासाठी लागलेल्या दर्शन रांगांनी उच्चांक गाठला आहे .
हेही वाचा…“१३ जुलैपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर…”, मनोज जरांगेंनी सांगितली पुढची योजना
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा लोणंद येथील मुक्कामाचा दुसरा दिवस आहे. लोणंदच्या पालखी तळावरील माऊलीच्या तंबू बरोबरच मालक, सोहळा प्रमुख, संस्थान, चोपदार, शितोळे सरकार , वासकर महाराज, पालखी सोहळा विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप, योगी निरंजन नाथ आदी मानाच्या दिंडयाचा मुक्काम ठिकाणी आहेत. या ठिकाणी पोलीस, आरोग्य, ग्रामपंचायत, वीज, आदी खात्यांचे केंद्रातुन वारकरी व भाविकांना मार्गदर्शन केले जात होते.
भाव तैसे फळ| न चले देवा पाशी बळ|
धावे जातीपाशी जाती| खूण येरा येरा चित्ती|
असा तुकाराम महाराजांचा अभंग एका दिंडीतील भजनात गायला जात होता.ठिकठिकाणी दिंड्यांचे तंबू लागलेले आहेत. या सगळ्यात लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत सर्वजण माऊलीच्या भक्तीत तल्लीण झाले आहेत . अनेक ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. वारकऱ्यांना सर्व त्या सेवा पुरविण्यात प्रशासन आणि या संस्था मग्न आहेत. अनेक ठिकाणी पंगती बसलेल्या आहेत. मिळेल त्या ठिकाणी वारकरी वामकुक्षी घेत आहेत. कमी जास्त अंतर चालत वारकरी आळंदीपासून थकून आल्याने आज मुक्काम करून सकाळी पुढच्या प्रवासाला निघणार आहेत.
हेही वाचा…सावकारकीच्या जाचाला कंटाळून मंदिराच्या पुजाऱ्याची आत्महत्या
वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरविण्यात अनेक संस्था पुढे आहेत. ठिकठिकाणी आरोग्य शिबिर तपासण्या सुरू आहेत. वारकरी भाविक माऊलींच्या भक्ती त असताना गुन्हेगारांना कुठेही संधी मिळणार मिळू नये यासाठी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व त्यांचे सर्व पथक परिसरावर नजर ठेवून आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख सपत्नीक वारीत सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि सर्व प्रशासन वारीमध्ये आहे. पालखी सोहळा मात्र दुपारच्या न्याहारीनंतरच पुढे जाईल. त्यानंतर तरडगाव चांदोबाचा लिंब येथे पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण होईल.