सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा अंतिम टप्प्यात पोहोचली असून तिसऱ्या दिवशी रात्री नंदिध्वजांचा मिरवणूक सोहळा होम मैदानावर दाखल झाल्यानंतर तेथील होमकुंडामध्ये असंख्य भाविकांच्या साक्षीने पूर्वापार परंपरेने अग्निप्रदीपन सोहळा संपन्न झाला. यावेळी हजारो भाविकांनी होमकुंडाच्या दिशेने फळांचा वर्षाव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायंकाळी उत्तर कसब्यातील हिरेहब्बू वाड्यातून सात नंदिध्वज होम मैदानावरील अग्निप्रदीपन सोहळ्यासाठी वाजत गाजत मिरवणुकीने निघाले. माणिक चौक ते खाटिक मशिदीदरम्यान रस्त्यावर पसारे यांच्या वाड्यासमोर रीतीरिवाजानुसार सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या मानाच्या पहिल्या नंदिध्वजाला नागफणी बांधण्यात आली. इतर सर्व नंदिध्वज आकर्षक विद्युत रोषणाईने दीपून गेले होते. नागफणी बांधलेले २९ फूट उंच नंदिध्वज पेलण्याचा मान सोमनाथ मेंगाणे यांना लाभला होता. त्यांनी एकट्याने नंदिध्वज होम मैदानापर्यंत पेलत नेले. पसारे वाड्यापासून ते विजापूर वेशीपर्यंत कला फाऊंडेशन संस्थेच्या कलावंत मुला-मुलींनी रांगोळीच्या आकर्षक पायघड्या घातल्या होत्या. भाविकांची पूजा स्वीकारत नंदिध्वज हळूहळू पंचकट्ट्यामार्गे रात्री होम मैदानावर दाखल झाले. त्यानंतर तेथील होमकुंडामध्ये अग्निप्रदीपन सोहळ्यास प्रारंभ झाला.

हेही वाचा – “इंदिरा-राजीव गांधी यांचे बोजड नेतृत्त्व स्वीकारणारे मिलिंद देवरा आता मिंध्यांच्या खुज्या…”, ठाकरे गटाची घणाघाती टीका

श्री सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाबरोबर विवाह केलेल्या कुंभारकन्येचा प्रतिकात्मक अग्निप्रवेश होतो. ज्वारी कडब्याच्या पेंढीला हिरवा शालू, हिरव्या बांगड्या, सौभाग्य अलंकार नेसवून कुंभारकन्येचे रूप दिले जाते आणि धार्मिक मंत्रोच्चाराने अग्निप्रदीपन सोहळा पार पाडला जातो. यावेळी भाविकांनी होमकुंडाच्या दिशेने पेरू, डाळिंब, बोर, गाजर आदी फळांचा वर्षाव केला.

हेही वाचा – परिवहन खात्याचा ‘रस्ता सुरक्षा अभियान’बाबत गोंधळ!

होमप्रदीपन सोहळ्यात होमकुंडाभोवती पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर नंदिध्वज सिद्धेश्वर मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाले. वाटेत जुन्या भगिनी समाज वास्तुसमोर (सध्याचे डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह) भाकणुकीचा कार्यक्रम होतो. यात्रेतील प्रमुख मानकरी देशमुख कुटुंबीयांच्या वासराला दिवसभर उपवास ठेवून भाकणुकीच्या ठिकाणी आणले जाते. तेथे वासरासमोर गूळ, खोबरे, कडधान्य, कडबा, गाजर आणि पाणी ठेवले जाते. वासराच्या खाण्यापिण्यासह मलमूत्राच्या आधारे हिरेहब्बू मंडळी पुढील वर्षाची भाकणूक करतात. यात पाऊसपाणी, महागाई, संकट आदी मुद्यांवर भाकणूक ऐकण्यासाठी शेकडो भाविक हजर होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devotees showered fruits during the hompradipan ceremony in siddheshwar yatra ssb
Show comments