कराड : बजरंग बली की जय, प्रभू रामचंद्र की जय, जय भवानी- जय शिवाजी, अशा जयघोषात पाटण तालुक्यातील सुंदरगडावर (दातेगड) हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सुंदरगडावरील ऐतिहासिक ठेवा असलेल्या खंजीर दरवाजात कातळामध्ये कोरलेली शक्ती देवता हनुमान मूर्तीवर हनुमान जयंतीनिमित्त शनिवारी पहाटे भाविकांनी पूजापाठ अभिषेक केला. यावेळी महाबलीच्या जयघोषाने सुंदरगड दुमदुमून गेला होता. तसेच पाटण येथील रामापूर हनुमान मंदिर, शहरातील लायब्ररी चौक हनुमान मंदिर, पोलीस वसाहत हनुमान मंदिर, ब्राह्मणपुरी हनुमान मंदिर यासह विविध ठिकाणी हनुमान जयंती भाविकांनी उत्साही वातावरणात साजरी केली.
हनुमान जयंतीनिमित्त सुंदरगडावर ऐतिहासिक खंजीर दरवाजातील हनुमान मूर्तीवर पंचगंगा, दुग्धाभिषेक अर्पण करून पूजा करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी बजरंग गर्जना, शिवगर्जनेचा जयघोष केला. तत्पूर्वी सुंदर स्वराज्य प्रतिष्ठान, सुंदरगड संवर्धनाच्या मावळ्यांनी खंजीर दरवाजा व परिसराची स्वच्छता केली. श्री. हनुमान व श्रीगणेश मूर्तींवर अभिषेक करून फुलांची पूजा मांडण्यात आली. भाविकांच्या उपस्थितीत सुंदरगडावर हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अनेक भाविकांनी गड व परिसर पाहण्याचा आनंद घेतला.
समर्थ स्थापित मंदिरात एकच गर्दी
दरम्यान, हनुमान जयंतीनिमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण राहताना, सर्वच मारुती मंदिरात आज दिवसभर शक्तीची देवता म्हणून लौकिक असलेल्या हनुमान मूर्तींची पूजा, होम हवन होताना, हनुमान चालीसा व रामरक्षा पठणही भक्तांकडून सुरू होते. अनेक ठिकाणी सामूहिकरीत्या हनुमान चालीसा व रामरक्षा पठण करण्यात आले. हनुमान मंदिरांना विद्युत रोषणाई व फुलांचा साज चढवण्यात आला होता. अनेक गावात आज गावदेवाची यात्राही संपन्न होत होती. समर्थ रामदास स्वामी स्थापित श्री. क्षेत्र चाफळ, उंब्रज, मसूर, शिंगणवाडी, शहापूर आदी ठिकाणच्या वीर मारुती, प्रताप मारुती, भीम मारुती अशा विविध नावाने स्थानापन्न असलेल्या हनुमानाच्या मंदिरात भक्तांची अक्षरशः रीघ लागली होती. दूरवरून लोक येथे महाबली हनुमानाच्या दर्शनासाठी आले होते. स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ व देवालयांच्या व्यवस्थापकांनी हनुमानच्या मंदिरात पूजा, पाठ, दर्शनरांग याची सुयोग्य व्यवस्था करताना, हनुमान भक्तांना आवश्यक सर्व सेवा- सुविधा पुरवल्या होता. मंदिर परिसरात मंडप, विद्युत रोषणाई, फुलांची सजावट होती, पूजेचे साहित्य, खेळणी व मेवा तसेच सौंदर्य प्रसाधनांची दुकाने लागली होती. त्यावर लोकांची गर्दी दिसत होती.