नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने १३,४२६ मतांनी विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांचा आणि स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा पराभव केला. या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचे अनेक मातब्बर उमेदवार पडले. मात्र धैर्यशील माने यांनी मात्र त्यांचा गड राखला. महाविकास आघाडीने राज्यात महायुतीवर मात केली. राज्यात महाविकास आघाडीने ३१ तर महायुतीने १७ जागा जिंकल्या. दरम्यान, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी विजयानंतर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खासदार धैर्यशील माने म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण ही लोकसभा निवडणूक लढलो. मोठ्या ताकदीने या निवडणुकीत यशस्वी झालो. पश्चिम महाराष्ट्रात अनेक बुरुज ढासळले आणि मी वादळात दिवा लावला. माझ्या मतदारसंघात दुपारपासूनच विरोधक गुलाल लावून फिरू लागले होते. त्यांना पाहून मलाच कळत नव्हतं की मतमोजणीच्या अद्याप काही फेऱ्या बाकी आहेत, तरी देखील यांनी आत्ताच जल्लोष करायला का सुरुवात केलीय? लोक सांगू लागले होते, मशाल पेटली, मशाल पेटली. परंतु, संध्याकाळी पाच वाजता पाऊस पडला आणि ती मशाल विझल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं.

खासदार माने म्हणाले, दिवसभर गुलाल लावून फिरणारे विरोधक संध्याकाळी सांगू लागले की ज्योतिबाला (श्री ज्योतिबा, कोल्हापूर) जाऊन आलो आहे. कारण अंगाला लावलेला गुलाल कोणाचा आहे हे ते सांगू शकत नव्हते. या निवडणुकीत लोकांमध्ये वेगळं वातावरण तयार झालं होतं आणि आपल्या मागे मोठी ताकदही नव्हती. कुठलाही साखर कारखाना, कुठलीही सूत गिरणी, दूधसंघ आपल्या पाठीशी नसताना आपण ही निवडणूक लढलो आणि जिंकलो. केवळ सामान्य माणसाच्या ताकदीमुळे आपण ही निवडणूक जिंकलो. अनेक उमेदवार निवडून येतील असं सांगितलं होतं. परंतु मातब्बर उमेदवार पडले. कोणत्याही सर्वक्षणात, कोणत्याही एक्झिट पोलमध्ये मी ही निवडणूक जिंकेन असं सांगितलं नव्हतं.

हे ही वाचा >> खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात अमेरिकेत सुनावणी, निखिल गुप्ताने सर्व आरोप फेटाळले

हातकणंगलेचे खासदार म्हणाले, माझे काही मित्र आहेत, मी त्यांचं नाव सांगणार नाही, ते मला सांगायचे की तुमचा दर खाली आहे, त्यामुळे तुम्ही निवडून येणार. मला ती गोष्ट समजायची नाही, दर खाली म्हणजे नेमकं काय? नंतर समजलं की हे लोक मटका खेळायचे. तुमचा दर खाली म्हणायचे आणि वर सांगायचे तुम्ही निवडून येणार. निवडणुकीच्या निकालानंतर मला कळलं मटका कसा लागतो ते समजलं. या मटका लावणाऱ्यांचं सर्वेक्षण वेगळं असतं. एक्झिट पोलचे सर्वेक्षण आणि यांचे सर्वेक्षण हे खूप वेगवेगळे असतात. हा चेष्टेचा विषय बाजूला सोडला तर ही निवडणूक म्हणजे मटका नव्हती. हा सामान्य माणसाच्या आयुष्याचा निर्णय होता. हा देश कोणाच्या हातात द्यायचा हे लोकांना ठरवायचं होतं. त्यामुळे हातकणंगलेच्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र दामोदरदास मोदी या माणसावर विश्वास दाखवला आणि मला त्यांचा शिलेदार म्हणून लोकसभेत पाठवलं