धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. धैर्यशील मोहिते हे येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या भेटीनंतर शरद पवार किंवा धैर्यशील मोहिते या दोघांपैकी कोणीही उमेदवारीबाबत किंवा पक्षप्रवेशाबाबत भाष्य केलं नाही. त्यामुळे माढ्यातील महाविकास आघाडीचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
धैर्यशील मोहिते पाटील १४ एप्रिल रोजी शरद पवार गटात प्रवेश करणार असून १६ एप्रिल रोजी ते माढ्यातून लोकसभेचा अर्ज भरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय. अशातच त्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर धैर्यशील मोहिते म्हणाले, शरद पवारांचे आणि आमच्या कुटुंबाचे अनेक वर्षांपासूनचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे मी त्यांची सदिच्छा भेट घ्यायला आलो होतो. मी त्यांना भेटलो आहे आणि आता पुन्हा मतदारसंघात जातोय.
धैर्यशील मोहितेंना प्रश्न विचारण्यात आला की, तुमचा १४ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) प्रवेश आणि १६ एप्रिलला तुम्ही उमेदवारी अर्ज भरणार असल्याच्या चर्चांमध्ये किती तथ्य आहे. यावर मोहितेंनी ‘वेट अँड वॉच’ असं उत्तर दिलं. यासह त्यांना इतरही अनेक प्रश्न विचारण्यात आले, प्रत्येक प्रश्नावर मोहितेंनी ‘वेट अँड वॉच’ असं उत्तर दिलं.
हे ही वाचा >> “राज ठाकरेंनी जनतेला आधीच इशारा दिलेला…”, जयंत पाटलांचं वक्तव्य; म्हणाले, “मनसे अध्यक्ष आता…”
माढा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या लोकसभेच्या उमेदवारीला धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोध दर्शवला आहे. धैर्यशील मोहितेंच्या मनात पक्षाने डावलल्याची भावना असल्यामुळेच ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे.