Dhananjay Deshmukh : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चर्चेत आहे. ९ डिसेंबर २०२४ या दिवशी त्यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. यानंतर या प्रकरणातल्या आरोपींना अटकही झाली. तर वाल्मिक कराड हा पोलिसांना ३१ डिसेंबरला शरण आला. दरम्यान सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींवर मकोका लावण्यात आला, काही दिवसांपूर्वीच वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आला. आता वाल्मिक कराड आणि हत्येतील आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. दरम्यान धनंजय देशमुख यांनी आज सीआयडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खंडणी आणि खुनाचं प्रकरण एकच आहे, आरोपींना फाशी दिली पाहिजे असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
व्हायरल फुटेजमध्ये काय?
व्हायरल सीसीटीव्ही फुटेज विष्णू चाटे याच्या केज येथील कार्यालयाबाहेर आहे. २९ नोव्हेंबरला वाल्मिक कराड या कार्यालयात आला होता. यावेळी वाल्मिक कराड याच्यासह संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करणारे प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि त्यांचे मित्र दिसत आहेत. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिका राहिलेले आणि निलंबित झालेले पीएसआय राजेश पाटील हेदेखील वाल्मिक कराड यांना भेटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. याबाबत आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे पण वाचा- Dhanajay Munde: वाल्मिक कराडबरोबर आर्थिक हितसंबंध? धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
धनंजय देशमुख काय म्हणाले?
“आम्ही तपास अधिकाऱ्यांना पुरावे दिले आहेत. आज आलेला व्हिडीओ, फोन कॉल सगळं काही मॅच होतं आहे. सगळा घटनाक्रम आहे. खंडणी ते खून यातले आरोपी एकच आहेत. खुनातलेच आरोपी आहेत. एकत्रित कट रचून खून करण्यात आला आहे. सगळ्यांना जाहीर फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.” असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
अंजली दमानिया काय म्हणाल्या?
“सगळ्यात गंभीर बाब ही आहे की गुन्हेगार तर फुटेज मध्ये बरोबर दिसत आहेत, ते असणारच. पण त्यांच्या बरोबर पीएसआय राजेश पाटील होते. त्यांची फक्त बदली करण्यात आली आहे. अशा अधिकाऱ्यांना गुन्हेगार केलं पाहिजे, सहआरोपी केलं जात नाही तोपर्यंत न्याय कसा मिळेल? जर त्या अधिकाऱ्याने आपलं काम चोखपणे केलं नसतं तर असे गुन्हे घडलेच नसते आणि संतोष देशमुख यांची हत्या झाली नसती.” असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. टीव्ही ९ मराठीशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर सुरेश धस यांनीही या प्रकरणात राजेश पाटील यांना सह आरोपी केलं जावं असं म्हटलं आहे.
भाजपाचे आमदार सुरेश धस काय म्हणाले?
सुरेश धस म्हणाले, “मी जे आरोप केले होते, त्याचे पुरावे एसआयटीने समोर आणले आहेत. माझे आरोप हवेतील नव्हते. या लोकांचा खंडणी, हत्येशी अकाचा संबंध आहे, यातून हे सिद्ध होतंय. अवादा कंपनींच्या शिंदेंना २९ नोव्हेंबरला गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं. तिथून मारत मारत येथे आणलं, त्यानंतर त्याला सोडून दिलं. त्याचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे. त्यामुळे १०१ टक्के आका, विष्णू चाटे, सुरेश आंधळे हे आरोपी आहेत.”