Dhananjay Deshmukh On Beed Case : बीड जिल्ह्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील विविध ठिकाणी मोर्चे निघत आहेत. तसेच या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे. तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. दरम्यान, यानंतर वाल्मिक कराडसह संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेतील सर्व आरोपींवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला एसआयटीने ताब्यात घेत बीड न्यायालयात हजर केलं. यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, वाल्मिक कराडला न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. ‘आम्ही वारंवार सांगत आहोत की, खंडणी ते खून प्रकरण असं या लोकांचं कनेक्शन आहे, त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा’, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

धनंजय देशमुख काय म्हणाले?

“आम्ही वारंवार सांगत आहोत की, खंडणी ते खून प्रकरण असं या लोकांचं कनेक्शन आहे. आम्ही गावातील लोकांना काम मिळावं, त्यांना रोजगार मिळावा, असा आमचा उद्देश होता. मात्र, संतोष देशमुख यांचा असा कुठेही उद्देश नव्हता की आपण कोणाची अडवणूक करावी. ज्या खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. कदाचित आरोपींना असं वाटलं असेल की आपल्याला हे कुठेतरी आडवे येतील. त्यामुळे आम्ही हे सांगत आहोत की खंडणी आणि खून प्रकरणाचं कनेक्शन आहे, हे आम्ही वेळोवेळी सांगितलं आहे”, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं.

“तपासात जे समोर आलं असेल त्या प्रमाणे एसआयटीने न्यायालयात सांगितलं असेल. एसआटीच्या तपासात निष्पन्न झालं असेल ते त्यांनी मांडलं असेल. जे घडलं आहे ते चुकीच्या प्रकारातून घडलं आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना फाशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. गावात कंपनी आली तर गावातील लोकांना रोजगार मिळेल असा आमचा उद्देश होता. पण आरोपींना वाटलं असेल की यापुढेही आपल्याला कोणत्या गोष्टीत अडसर येईल. त्यांनी तशा पद्धतीचा चुकीचा विचार केला असेल. त्यामधून आरोपींनी हत्या केली असेल”, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay deshmukh on santosh deshmukh beed case valmik karad police custody for 7 days beed court gkt