Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली, तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. तसेच वाल्मिक कराड खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांना शरण आला असून तोही पोलीस कोठडीत आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी निषेध मोर्चेही निघत आहेत. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर आता मकोका लावण्यात आला आहे. मात्र, वाल्मिक कराडचाही या हत्येच्या घटनेत सहभाग असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
दरम्यान, आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी टॉवरवर चढून स्वतःला संपवून घेण्याचा इशारा दिला आहे. तपास यंत्रणा आम्हाला तपासाबाबत कोणतीही माहिती देत नसून काही आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का? तसेच खंडणी ते खून प्रकरणाचं कनेक्शन असून सर्व आरोपींवर मकोका लावण्यात यावा आणि सर्व आरोपींना (वाल्मिक कराडलाही) ३०२ मध्ये घ्यावं, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. तसेच जर सर्व आरोपींवर मकोका आणि सर्व आरोपींना ३०२ च्या गुन्ह्यांत घेतलं जात नसेल तर मी सोमवारी (१३ जानेवारी) टॉवरवर चढून स्वतःला संपवून घेईल, असा इशारा धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
धनंजय देशमुख काय म्हणाले?
“मस्साजोगच्या गावकऱ्यांची काय भूमिका आहे ते त्यांचं ठरवतील. मात्र, माझी भूमिका मी स्पष्ट करणार आहे. आज ३५ दिवस झाले आहेत. गेल्या ३५ दिवसांत आम्ही सर्व यंत्रणा ते मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवला. मला कालपर्यंत अपेक्षित होतं की मला तपासाबाबत संपूर्ण माहिती मिळेल. सर्व सीडीआर निघालेत का? जर पुरावे नष्ट झाल्यानंतर मला सर्व समजणार असेल तर मग माझ्या भावाला न्याय मागण्यात अर्थ काय? मी प्रत्येकवेळी विश्वास ठेवला. मात्र, आता मी काही भूमिका घेणार आहे. ती भूमिका मी पूर्ण गांभीर्याने आणि विचार करून घेत आहे. मुख्यमंत्री आणि सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व यंत्रणेला मी पुरावे एफआयआर प्रमाणे दिले आहेत. मी वेळोवेळी सांगतोय की खंडणी ते खून प्रकरणातील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि खंडणी ते खून या प्रकरणाचं काय कनेक्शन आहे? सीआयडीने ज्या दिवशी पहिली सुनावणी झाली होती तेव्हाच स्पष्ट केलं होतं. त्यावर आरोपीला १५ दिवसांचा पीसीआर देण्यात आला होता”, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं.
“आता माझी भूमिका अशी आहे की, आरोपीला मकोका अंतर्गत आणि ३०२ च्या गुन्ह्यात जर घेतलं नाही तर उद्या १० वाजल्यापासून माझं आणि माझ्या कुटुंबाचं वैयक्तिक आंदोलन मोबाईल टॉवर करणार आहोत. त्या टॉवरवर जाऊन मी स्वत:ला संपवून घेतो. याचं कारण आहे की हे आरोपी जर सोडले तर उद्या हे माझाही खून करतील. मग माझ्या कुटुंबातील न्याय मागणारा कोणी नसेल, मला भिती आहे. हे खंडणी ते खून हे कनेक्शन आहे, हे खंडणीतूनच झालेलं आहे. मला जर न्याय मिळत नसेल, माझ्या कुटुंबाला सर्व माहितीपासून दूर ठेवलं जात असेल तर मी माझा निर्णय घेतलेला बरा आहे. मी उद्या १० वाजता माझ्या आंदोलनाला सुरुवात करणार आहे. मी टॉवर जाऊन स्वत:ला संपवून घेणार आहे, कारण मला या सगळ्यांपासून भिती आहे. तपास यंत्रणा जर आम्हाला माहिती देत नसेल आणि कोणालातरी वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर आमच्या न्याय मागण्याला काहीही अर्थ नाही”, अशी संतप्त प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.