Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृणपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केलं, तर काही आरोपी अद्यापही फरार आहेत. फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दुसरीकडे पवनचक्की प्रकरणात दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. मात्र, वाल्मिक कराडला विविध सुविधा देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यातच मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माजी सरपंच बालाजी तांदळे यांनी वाल्मिक कराडची भेट घेतल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात आपल्यालाही अरेरावी केल्याचा आरोप केला होता.
तसेच धनंजय देशमुख यांनी यासंदर्भात बीडच्या पोलीस अधीक्षकांनाही पत्र लिहिलं होतं. यामध्ये कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला मिळणाऱ्या सुविधा आणि यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला होता. तसेच वाल्मिक कराड कोठडीत असताना त्याची भेट घेणारा माजी सरपंच कोण? असा सवाल धनंजय देशमुखांनी विचारला होता. या आरोपानंतर आज बालाजी तांदळे यांनी स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच माझी आणि वाल्मिक कराडची भेट झाली नसून सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यामुळे धनंजय देशमुखांनी केलेले आरोप खोटे असल्याचं बालाजी तांदळे यांनी टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे.
बालाजी तांदळे यांनी काय स्पष्टीकरण दिलं?
धनंजय देशमुखांनी केलेल्या आरोपासंदर्भात बोलताना बालाजी तांदळे यांनी म्हटलं की, “मी वाल्मिक कराडला भेटायला गेलो हे चुकीचं आहे. कारण वाल्मीक कराडला भेटायला मी गेलो नव्हतो, तर मला तपासाकामी सीआयडीने बोलावलं होतं. सीआयडीने मला एका रुममध्ये बसवून काही प्रश्न विचारले. मी वाल्मिक कराडला भेटायला गेलो नव्हतो आणि माझी त्यांच्याशी भेटही झाली नाही. मला सीआयडीच्या कार्यालयामधून फोन आला होता. त्यानंतर मला सांगितलं की केजमध्ये या. पुन्हा मला सांगितलं की बीडमध्ये या. मग मी बीड सीआयडीच्या कार्यालयात आलो असता तीन तास चौकशी झाली. पण मध्ये मी बाथरूमला गेल्यानंतर बाहेर येताना मला धनंजय देशमुख दिसले. तेव्हा मी सांगितलं की सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी बोलावलं होतं. मी कोणालाही भेटायला आलेलो नाही”, असं बालाजी तांदळे यांनी म्हटलं.
सीआयडीने का बोलावलं होतं?
“सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील काही आरोपी अद्यापही फरार आहेत. त्या फरार आरोपींसंदर्भात काही माहिती आहे का? यासंदर्भाने मला सीआयडीने बोलावलं होतं. मात्र, मी जर वाल्मिक कराडला भेटण्यासाठी गेलो असेल तर त्या कोठडीतील सीसीटीव्ही तपासा म्हणजे मी खोट बोलत असेल तर सीसीटीव्हीत काय ते दिसेल”, असं बालाजी तांदळे यांनी म्हटलं आहे.