Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana at Kolhapur BJP Rally : “लाडकी बहिणी योजनेचे १५०० रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या प्रचारफेऱ्यांमध्ये दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, आम्ही त्यांची व्यवस्था करतो”, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी (९ नोव्हेंबर) रात्री कोल्हापुरात आयोजित एका प्रचारसभेत बोलताना केलं. त्यांच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी या वक्तव्यावरून खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यातील महिलांची माफी मागावी अशी मागणी केली आहे. तर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी ‘ही तर धनंजय महाडिक यांची मुजोरी आहे’, अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना हा प्रचाराचा केंद्रबिंदू बनला आहे. कोल्हापुरात झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेत १५०० रुपयांऐवजी दर महिन्याला २१०९ रुपये देण्याची घोषणा केली. तर, त्यापाठोपाठ महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात महालक्ष्मी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक वाद चालू असतानाच भाजपा नेते धनंजय महाडिकांनी हे वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे.
हे ही वाचा >> Jayant Patil : “अरे बाप नाही, तुझा काकाच…”, जयंत पाटलांचं अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर
धनंजय महाडिकांची माफी
दरम्यान, या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून महाडिकांवर टीका होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांनी आता माफी मागितली आहे. महाडिकांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो”.
महाडिकांचं आणखी एक वक्तव्य
महाडिकांनी म्हटलं आहे की “माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते. तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकारमुळेच यशस्वी झाली असल्याचे ठामपणे नमूद करताना विशेषतः व्होट जिहाद करणाऱ्या महिलांच्या प्रती आलेली स्वाभाविक प्रतिक्रिया आहे”.
हे ही वाचा >> Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”
भाजपा खासदार म्हणाले, “मी माझ्या वैयक्तिक, राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलेलो आहे. मी व माझी पत्नी गेली अनेक वर्षे भगीरथी महिला संस्थेमार्फत महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी नेहमीच चांगले काम करत आलो आहोत आणि यापुढे देखील करत राहीन. महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरणबाबत माझ्या या प्रयत्नांची दखल घेऊन माझ्या वक्तव्याने मन दुखावलेल्या माझ्या भगिनी मला मोठ्या मनाने माफ करतील, अशी आई अंबाबाई चरणी मी प्रार्थना करतो”.
हे ही वाचा >> “BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
धनंजय महाडीक काय म्हणाले होते?
धनंजय महाडिक म्हणाले होते, “जर या ठिकाणी काँग्रेस पक्षाची रॅली निघाली आणि त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या, ज्या महिला १५०० रुपये आपल्या योजनेचे घेतात, त्यांचे फोटो काढून घ्या आणि नावं लिहून घ्या. म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही. अनेक ताया महाराष्ट्रात छाती बडवत आहेत. आम्हाला पैसे नकोत, आम्हाला सुरक्षा पाहिजे असं म्हणतात. मग पैसे नकोत का? या पैशांचं राजकारण करता? आता काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे. काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे आणि आमच्याकडे द्यायचे, आम्ही त्यांची व्यवस्था करतो. जर कोणी मोठ्याने भाषण करायला लागली तर एक फॉर्म द्यायचा आणि या फॉर्मवर सही कर म्हणायचं. नको आहेत ना पैसे. लगेच उद्यापासून बंद करतो म्हणायचं. लगेच बंद, आमच्याकडेही पैसे जास्त झाले नाहीत”.