पश्चिम महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेल्या निवडणूक संग्रामात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी ३३ हजार २५९ मतांनी विजय मिळवला. महाडिक यांना ६ लाख ७ हजार ६६५ इतकी मते मिळाली, तर त्यांचे विरोधी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना ५ लाख ७४ हजार ४०४ इतकी मते मिळाली. निकालानंतर महाडिक यांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उत्साहाला-आनंदाला उधाण आले. संपूर्ण राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची पिछेहाट झाली असली तरी, धनंजय महाडिक यांनी स्वतच्या ताकदीच्या बळावर आणि  दोन्ही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून विजय खेचून आणला.    
सकाळी ठिक ८ वाजता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली. सकाळी पावणेनऊच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला. पहिल्या फेरीपासूनच धनंजय महाडिक यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार संजय मंडलिक यांच्यावर आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत महाडिक यांनी ७ हजार ४४५ इतकं मताधिक्य घेतलं. तिसऱ्या फेरीत महाडिक यांची आघाडी ९ हजार ६२१ वर जावून पोहोचली. सातव्या फेरीअखेर धनंजय महाडिक यांना १ लाख ८९ हजार ६५६ इतकी मतं मिळाली तर मंडलिक यांना १ लाख ६९  हजार ४२४ इतकी मतं मिळाली होती. महाडिक यांची आघाडी २० हजार २३२ वर जाऊन पोहोचली. १२ व्या फेरीपर्यंत महाडिक यांच्या मताधिक्याचा आकडा ३१ हजाराच्या वर गेला. मात्र १३ व्या फेरीमध्ये धनंजय महाडिक यांचं मताधिक्य काहीसं घटले. मात्र १८ व्या फेरीनंतर पुन्हा महाडिक यांचं मताधिक्य वाढत गेलं. दुपारी ३ च्या सुमारास निकालाचं चित्र स्पष्ट झालं आणि २८ फेऱ्या झाल्यानंतर अंतिमत धनंजय महाडिक हे ३३ हजार २५९ मताधिक्यांनी विजयी झाले. या निवडणुकीत पहिल्यांदाच उपलब्ध झालेल्या नोटा पर्यायाचा ७ हजार १५ मतदारांनी वापर केला.
धनंजय महाडिक यांच्या विजयाचे संकेत मिळताच, कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली. गुलालाची प्रचंड उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत, ठिकठिकाणी धनंजय महाडिक यांच्यावर प्रेम करणारे हजारो कार्यकत्रे देहभान हरपून नाचत होते. शहराच्या अनेक भागात कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून उत्स्फूर्त रॅली काढल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा उंचावत आणि धनंजय महाडिक यांच्या विजयाच्या घोषणा देत, संपूर्ण मतदारसंघात हजारो-लाखो कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. त्यामध्ये तरुणाई आघाडीवर होती. कोल्हापूर शहरातील अनेक ठिकाणी धनंजय महाडिक यांचे समर्थक आणि पाठीराखे रस्त्यावर उतरून जल्लोष करू लागले. संगीताच्या ठेक्यावर ताल धरत, गुलालाची उधळण करत कार्यकत्रे बेभान झाले होते. काही उत्साही कार्यकर्त्यांनी महाडिक आणि नामदार हसन मुश्रीफ यांना खांद्यावर घेऊन जल्लोष केला.
धनंजय महाडिक यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामाची पोच पावती म्हणून जनतेनं आपल्याला कौल दिला असून, जनतेचा विश्वास सार्थ ठरवू. हा जनतेचा विजय आहे. कोल्हापूरच्या जनतेनं विश्वासानं विकासकामाच्या जोरावर मतं दिली आहेत. त्यामुळं आपली खासदारकी कोल्हापूरच्या विकासासाठीच राहील, असेही महाडिक यांनी नमुद केले.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा