Seeshiv Dhananjay Munde Insta Post: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे हे सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांच्याभोवती वाद निर्माण झाला असतानाच आता त्यांना कौटुंबिक प्रकरणांना सामोरे जावे लागत आहे. धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी त्यांच्याविरोधात कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती. या खटल्यात न्यायालयाने अंतरिम निकाल दिला असून करुणा मुंडे यांना मासिक १ लाख २५ हजार रुपयांचा देखभाल खर्च मिळावा, असे निर्देश दिले आहेत. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे करुणा मुंडे यांनी सांगितले असून माध्यमांसमोर धनंजय मुंडे यांच्याविरोधात अनेक आरोप केले. यानंतर आता धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या मुलाने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत आपली भावना व्यक्त केली आहे.
इन्स्टाग्रामवर सीशिव मुंडे या अकाऊंटवरून सदर पोस्ट टाकण्यात आली आहे. या पोस्टनंतर करुणा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली असून मुलाची भावना योग्य असल्याचे म्हटले आहे. तसेच धनंजय मुंडे हे मुलांची काळजी घेत असल्याचेही करुणा मुंडे यांनी सांगितले.
सीशिव मुंडेंने आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “मी सीशिव धनंजय मुंडे असून मला आता बोलणे भाग आहे. माझ्या कुटुंबाला माध्यमांनी मनोरंजनाचा विषय बनवले. माझे वडील सर्वोत्कृष्ट वडील नसले तरी त्यांनी आम्हाला कधी नुकसान पोहोचवले नाही. माझ्या आईला परिस्थिती व्यवस्थित हाताळता आली नाही. तिच्याकडून कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला जातो. पण माझ्या आईनेच वडिलांना मारहाण केली होती. तेव्हापासून ते निघून गेले. तिच्या वागण्याचा मला आणि माझ्या बहिणीलाही त्रास झाला. त्यानंतर तिने आम्हालाही निघून जाण्यास सांगितले.”
सीशिव मुंडेंने पुढे म्हटले की, २०२० पासून माझे वडील आमची काळजी घेत आहेत. माझ्या आईला कोणतीही आर्थिक अडचण नाही. तिने घराच्या कर्जाचे हप्तेही फेडलेले नाहीत. माझ्या वडिलांचा सूड उगविण्यासाठी ती खोट्यानाट्या गोष्टी सांगत आहे.
मुलाच्या दाव्यावर करुणा मुंडे काय म्हणाल्या?
मुलगा सीशिवच्या पोस्टनंतर करुणा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, मुलाच्या भावना योग्य आहेत. धनंजय मुंडे हे त्यांच्या मुलांबरोबर खूप चांगले वागले आहेत. मुलं आणि वडिलांमध्ये चांगले संबंध आहेत. आज कौटुंबिक न्यायालयाने जो निर्णय दिला, त्यावरच मी बोलले आहे. माझ्या मुलांवरही विशिष्ट पद्धतीने बोलण्याचा दबाव आहे, असा दावा करुणा मुंडे यांनी केला.