माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्यांचे कुटुंबीय नाराज असून ते वेगळे राहत असल्याचा आरोप सातत्याने केला जातोय. भाजपा आमदार सुरेश धस यांनी असा आरोप केला असून धनंजय मुंडे यांचे चुलत भाऊसुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याचा दावा सुरेश धसांनी केलाय. त्यांच्या या दाव्यानंतर आता खुद्द धनंजय मुंडे यांचे भाऊ अजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला.

“धनंजय मुंडे यांच्या कुटुंबात कलह सुरू असून चुलत भाऊ नाराज आहेत”, असा आरोप केला जातोय. त्यामुळे ही पत्रकार परिषद घेत आहे, असं म्हणत अजय मुंडे म्हणाले, आमच्या बाई (धनंजय मुंडे यांच्या आई) परळीला राहत होत्या. परळीतील निवासस्थानचं रिनव्हेशनचं काम धनंजय मुंडे यांनी हाती घेतलंय. गावाकडे घर असल्याने बाईंनी गावाकडे राहायची इच्छा व्यक्त केली. धनंजय मुंडेही परळीला आले तरी ते आईकडे राहतात. पण सध्या सनसनाटी आरोप करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आपण कुठवर गप्प बसणार?”

“हजार कार्यकर्ते गप्प आहेत. संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा आहे, या हेतुने आम्ही शांत आहोत. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की संपूर्ण कुटुंब एक आहे. धनंजय मुंडे यांनी २०-२५ वर्षे खस्ता खालल्या आहेत. आज दोघे बहिण भाऊ मंत्री झाले असताना विरोधकांना खुपतंय. त्यांना बदनाम केलं जातंय. त्यांची प्रकृती वाईट असून ते अनेक आजारांना सामोरे जात आहेत, पण आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांच्यावर कोणीही नाराज नाही”, अशी प्रतिक्रिया अजय मुंडे यांनी दिली. तसंच परळीची नाहक बदनामी केली जातेय, याचं आम्हाला वाईट वाटतंय, असंही अय मुंडे म्हणाले.

Story img Loader