Dhananjay Munde at NCP convention At Shirdi : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील नव-संकल्प शिबीर – २०२५ या कार्यक्रमात बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी २०१९ साली झालेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मुंडे म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यापासून आजवरच्या वाटचालीत आमचे नेते म्हणून अजित पवार यांच्या पाठीशी उभा राहिलो आहे. अनेक प्रसंगी अजित पवारांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांच्या अंगावर कोणी आले तर त्याला आम्ही त्याला शिंगावर घेतले. २०१४ – १९ या काळात मी विरोधी पक्षनेतेपदी काम केलं. पक्षाच्या पडत्या काळात चार वेळा हल्लाबोल, परिवर्तन, शिवस्वराज्य आदी यात्रांमध्ये सहभागी होऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. तसेच तत्कालीन सरकारला वाकवायचे काम केले. २०१९ साली पहाटेची शपथ घेऊ नका हे मी सांगितले होते. ती शपथ त्यांनी घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली.
धनंजय मुंडे म्हणाले, “सामाजिक न्याय मंत्री म्हणून मी चांगले काम करून दाखवले. गाव – वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणे, ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ यांसारखे अनेक क्रांतिकारी निर्णय त्या काळात घेतले. ११ हजार कोटी रुपये पीकविमा एका वर्षात मिळवून देणारा कृषिमंत्री मी होतो. मात्र, त्यावरूनही टीका झाली. अर्धवट माहिती देऊन बदनामी करणारे लोक यावर बोलत नाहीत”.
“सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी जाऊ नकेस असा सल्ला मला दिला गेला”
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणाले, “लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी गेलो होतो. त्यावेळी बारामती लोकसभा निवडणुकीत खासदार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी जाऊ नकोस अन्यथा पुढे विधानसभेत त्याचा तुला त्रास होईल, असा सल्ला मला अनेकांनी दिला होता. तरीही मी गेलो. माझ्यासह अनेकांना विधानसभा निवडणुकीत ठरवून टार्गेट केले गेले. मी माझ्या परळीच्या जनतेच्या आशीर्वादाने एक लाख चाळीस हजार मतांच्या फरकाने निवडून आलो, त्याचीच पोटदुखी अनेकांना प्रकर्षाने झाली. ठाण्यात मी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला गेलो म्हणून तिथले नेते बीडमध्ये येऊन मला टार्गेट करत आहेत, हेही उघड झाले”.
धनंजय मुंडे म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत मी केवळ ५ दिवस पूर्णवेळ परळीत होतो, उर्वरित वेळेत मी पक्षाच्या अनेक उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या, बैठका घेतल्या. त्यातील बहुतांश उमेदवार निवडून आले”.