शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार कृषीमंत्री असताना त्यांनी आयोजित केलेला कृषीमहोत्सव वादात सापडला होता. आता कृषीमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर अजित पवार गटातील धनंजय मुंडेंकडे आलं. यानंतर या महोत्सावासाठी पुन्हा ५४ लाख ७१ हजार रुपये मंजूर केल्याचं बोललं जात आहे. याबाबत पत्रकारांनी धनंजय मुंडेंना विचारणा असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.
धनंजय मुंडे म्हणाले, “हा प्रश्नच चुकीचा आहे. कृषी महोत्सवाबाबत ५७ लाख रुपयांची देयकं देणं बाकी होती. ती देयके कृषी विभागाला द्यायची आहेत. ही देयके द्यावीत की नाही हे कृषीमंत्र्याला विचारलं जात नाही. हा निर्णय खालच्या पातळीवर अधिकाऱ्यांच्या स्तरावर घेतला आहे आणि देयके दिली आहेत.”
“शेतकरी आभाळाखाली शेती करणारी एकमेव जात”
धनंजय मुंडे पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांची आत्महत्या केवळ यवतमाळ जिल्ह्यात नाही, तर सर्वदूर महाराष्ट्रात होते. या आत्महत्या आज होत नाहीत. शेतकऱ्यांसमोर असंख्य संकटं आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला तर हा भाव खाली कसा जाईल अशा बातम्या माध्यमं करतात. भाव नाही मिळाला तर टोमॅटो फेकून दिल्याच्याही बातम्या केल्या जातात. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, शेतकरी आभाळाखाली शेती करणारी एकमेव जात आहे. त्यामुळे निसर्गाचं प्रत्येक संकट शेतकऱ्याला अडचणीत आणतं.”
हेही वाचा : “माझी तक्रार ही आहे की, मागील निवडणुकीत त्यांनी…”; शरद पवारांचा अजित पवार गटावर हल्लाबोल
“शेतकऱ्यांच्या खिशातील १५०० कोटी रुपये वाचले”
“कधी पाऊस, गारपीट, दुष्काळ, पूर अशा सर्व परिस्थितीला शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं. अशा संकटाच्या काळात अल्पकालीन, मध्यम व दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील. शेतकऱ्याला शाश्वत शेतीचा आधार द्यावा लागेल. आम्ही तोच आधार देण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणूनच शेतकऱ्याच्या पिक विम्याचा हिस्सा सरकारने भरला. शेतकऱ्याला एक रुपयाच भरावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशातील १५०० कोटी रुपये वाचले,” असंही मुंडेंनी नमूद केलं.