राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि पक्षात फुट पडलेली नाही, असं वक्तव्य केलं. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोर अजित पवार गटातील नेते व राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (२५ ऑगस्ट) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
आमदारांची अपात्रता, हकालपट्टी आणि तुम्ही शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्याबाबत नेमकं सत्य काय आहे? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता धनंजय मुंडे म्हणाले, “माध्यमांना याबाबत जिथपर्यंतची माहिती आहे तिथपर्यंत ते सत्य आहे. ते काही डावलण्याला अर्थ नाही. लोकशाहीत कुणी वेगळा विचार केला म्हणजे पक्ष फुटला नाही, असं शरद पवार म्हणत असल्याचं मी ऐकलं.”
“आम्हाला पुन्हा एकदा देवाकडून आशीर्वाद मिळाला”
“शरद पवारांच्या वाक्याचा अर्थ माझ्या दृष्टीने इतकाच निघतो की, पक्षातील बहुतांश लोकांची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्या इच्छेला आशीर्वाद द्यावा असं आम्ही गेली अनेक दिवस म्हणत होतो. तो आशीर्वाद आम्हाला पुन्हा एकदा देवाकडून मिळाला आहे. याचा अर्थ मी एवढाच काढतो,” असं म्हणत धनंजय मुंडे यांनी शरद पवारांनी अजित पवारांबाबत केलेलं वक्तव्य आशीर्वाद आहे की राजकीय खेळी? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिलं.
हेही वाचा : “अजित पवार आमचे नेते”, या शरद पवारांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“दुष्काळाची दाहकता सर्वांना लक्षात येत आहे”
दुष्काळावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, “दुष्काळाची दाहकता सर्वांना लक्षात येत आहे. मराठवाड्याच्या दोन जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये पाऊस नसल्याने पीकं करपून चालली आहेत.”
“पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार”
“उद्या पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. या सर्व बाबींवर हे सरकार अतिशय गंभीर आहे. मी कृषीमंत्री म्हणून, अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री दुष्काळावरील या बैठकीत सहभागी होणार आहेत,” अशी माहिती धनंजय मुंडेंनी दिली.