इंडोनेशियात अटक करण्यात आलेला कुख्यात गुंड छोटा राजनवरील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद मुंबईत असतानाही त्याच्याशी संबंधित सर्व गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपविण्याच्या निर्णयावरून विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. छोटा राजनवरील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी राज्याचे गृहखाते आणि मुंबई पोलीस सक्षम नाहीत का? असा सवाल विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
छोटा राजनवर दाखल असलेले सर्व गुन्हे तपासासाठी सीबीआयकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय गुरूवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयावरून धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जात असताना राज्याच्या गृहखात्याला वारंवार सीबीआयकडे का जावे लागते? राज्याचे गृहखाते आणि मुंबई पोलीस छोटा राजनवरील गुन्ह्यांचा तपास करण्यास सक्षम नाही का? कुख्यात अंतरराष्ट्रीय डॉनच्या सांगण्यावरून आता राज्याचे गृहखाते चालणार आहे काय?, अशी प्रश्नांची सरबत्ती करत धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. तसेच राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच गुन्हेगाराच्या सांगण्यावरून तपास यंत्रणा बदलण्यात आली की काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाल्याचेही धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत कृषि विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमात एकत्र उपस्थित आहेत. फडणवीस यांच्यासोबत महसूलमंत्री एकनाथ खडसे देखील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनात शरद पवार यांच्यासोबत एकत्र सहभागी झाले असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे फडणवीसांवर टीका करत आहेत.
कुख्यात अंतरराष्ट्रीय डॉनच्या सांगण्यावरून आता राज्याचे गृहखाते चालणार आहे काय ? @NCPspeaks @mimarathinews @zee24taasnews @abpmajhatv
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 6, 2015
मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जात असतांना राज्याच्या गृहखात्याला वारंवार CBI कडे का जावे लागत आहे ? @vaibhavparab21
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 6, 2015
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच गुन्हेगाराच्या सांगण्यावरून तपास यंत्रणा बदलण्यात आली की काय ? @NCPspeaks @zee24taasnews @vaibhavparab21
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 6, 2015
छोटा राजनवरील गुन्ह्यांचा तपास करण्यास राज्याचे गृहखाते, मुंबई पोलिस सक्षम नाही का ? @NCPspeaks @abpmajhatv @vaibhavparab21 @mimarathinews
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 6, 2015