दोन धर्मांमध्ये कोणकोणत्या कारणावरून वाद सुरू ठेवायचा आणि आपली राजकीय पोळी भाजायची, एवढंच सध्या सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपावर केली आहे. शिर्डीत सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा’ हे अभ्यास शिबिरात बोलताना त्यांनी ही टीका केली. तसेच २०२४ ची निवडणूक आपल्याला शरद पवारांसाठी जिंकावी लागेल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – “शिंदे गटाने उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने…”; गुलाबराव पाटलांचा मोठा दावा
काय म्हणाले धनंजय मुंडे?
“राम मंदिर आणि कलम ३७० ही दोन मास्टर कार्ड भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकारण करण्यासाठी वापरत होते. मात्र, आता ती राहिलेली नाहीत. त्यामुळे दोन धर्मांमध्ये कोणकोणत्या कारणावरून वाद सुरू ठेवायचा आणि आपली राजकीय पोळी भाजायची, एवढंच सध्या सुरू आहे”, अशी टीका धनंजय मुंडे यांनी भाजपावर केली. तसेच “जे ४० आमदार सुरत-गुवाहाटी-गोवा असा प्रवास करून मुंबईत आले, ते आज राज्यातील सरकार चालवत असून या सरकारमध्ये अनेक मदभेत आहेत”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – “नारायण राणेंना आपुलकीचा सल्ला, अजित पवारांचा नाद करू नका; ते…”, राष्ट्रवादीचा खोचक टोला!
“शरद पवारांसाठी २०२४ निवडणूक जिंकावी लागेल”
“मी १०-१२ दिवसांपूर्वी दिल्लीला गेलो होतो. तेव्हा भाजपाच्या एक मोठ्या नेत्याशी माझी भेट झाली. ते मला म्हणाले की, शरद पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांच्या एका शब्दावर दिल्लीही निर्णय घ्यावे लागतात. असे असताना ज्याप्रमाणे नवीन पटनायक यांच्या मागे उडीसा उभा राहतो किंवा ममता बॅनर्जींसाठी पश्चिम बंगाल उभा राहतो, त्याप्रमाणे शरद पवारांच्या मागे महाराष्ट्र का उभा राहत नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यामुळे शरद पवारांच्या मागे महाराष्ट्र उभा आहे. हे आपल्याला दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला २०२४ ची विधानसभा निवडूक जिंकावी लागले. हा संकल्प आपल्याला आज शिर्डीतून करायचा आहे”, अशी प्रतिक्रियाही धनंजय मुंडे यांनी दिली आहे.