बीडमध्ये यंदा दोन दसरा मेळावे होत आहेत. भाजपाच्या आमदार पंकजा मुंडे यांच्या भगवानगडावरील दसऱ्या मेळाव्याबरोबरच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही नारायणगडावर दसरा मेळावा आयोजित केला आहे. मात्र, यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान, नारायणगडावरील मेळाव्यावरून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. भगवानगडावरील दसऱ्या मेळाव्यात बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं.
नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?
“ज्याला दसरा माहिती त्याला प्रभू श्रीरामसुद्धा माहिती आहे. पुढचं मी बोलणार नाही, तुम्ही समजून घ्या. अनेक वेळा संकटाच्या काळात तुम्ही गोपीनाथ मुंडे तसेच पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे उभे राहिलात. संघर्षाच्या काळात तुम्ही हा मेळावा केला, पंकजा मुंडे यांच्याबरोबर कोण आहे, कोण नाही, हे बघितलं नाही. खरं तर १२ वर्ष आपलं पटलं नाही. पण या १२ वर्षांत मी कधीही वेगळा मेळावा घेण्याचा प्रयत्न केला नाही. तसा विचारही मनात आणला नाही. ज्याला जो वारसा दिला आहे, त्याने तो चालवायला पाहिजे. नवीन मेळावा सुरु करून कोणीही या मेळाव्याची पवित्रता संपवू शकत नाही”, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.
“आम्ही केलेला संघर्ष स्वत:साठी नाही, तर जनतेसाठी होता”
पुढे बोलताना, “कुणी म्हणत असेल की निवडणुकीच्या निकालावरून आपण एकत्र आलो. पण माझ्यादृष्टीने हा विचारांचा,भक्तीचा, शक्तीचा, तसेच पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आहे. आपल्या सगळ्यांचे जीवन संघर्षातून गेले आहे. आजही आपण सगळे संघर्ष करतो आहे. त्या संघर्षाची सुरुवात गोपीनाथ मुंडे यांनी केली. त्यांनी केलेला संघर्ष स्वतःसाठी कधीच नव्हता. पंकजा मुंडे यांनी केलेलाही संघर्षही स्वतःसाठी कधीच नव्हता. आम्ही जो संघर्ष करतो आहे, तो केवळ तुमच्यासाठी आहे”, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
“१२ वर्षांच्या तपानंतर मी दसरा मेळाव्याला आलोय”
“आज मी भारून गेलो आहे. १२ वर्षांच्या तपानंतर मी दसरा मेळाव्याला आलो आहे. या पवित्र दसरा मेळाव्याची एक आगळीवेगळी परंपरा आहे. ही परंपरा माझ्या या सर्व पिढीला लक्षात आली पाहिजे. भगवानगडाचा वर्धापन दिन म्हणजे दसरा मेळावा भगवान बाबांच्या पवित्र हातांनी सोनं देऊन केला जायचा. या पवित्र दसरा मेळाव्याची परंपरा आपल्या सगळ्यांचं दैवत असेलल्या गोपीनाथ मुंडे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत चालवली. त्यानंतर ही पवित्र दसरा मेळाव्याची परंपरा पंकजा मुंडे चालवत आहेत. एक मोठा भाऊ म्हणून मला त्याचा अभिमान आहे”, अशी प्रतिक्रियाही धनंजय मुंडे यांनी दिली.