जिथे पवार आडनाव दिसेल, तिथे मतदान करा, म्हणजे आपली परंपरा खंडित होणार नाही, असे आवाहन अजित पवार यांनी बारामतीतील जनतेला केले होते. यासंदर्भात बोलताना शरद पवार यांनी एक मूळचे पवार आणि दुसरे बाहेरून आलेले पवार, असे म्हणत सुप्रिया सुळे याच मूळ पवार असल्याचे सुचविले होते. शरद पवारांच्या या विधानावरून आता धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
शनिवारी बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. “एक निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार सुनेला परकं म्हणाले. आज त्यांच्या घरातही मुली आहेत. त्या मुली उद्या सून म्हणून कोणाच्यातरी घरी जातील. कुणाचीतरी लेकी उद्या सून म्हणून त्यांच्या घरता येईल. मात्र, फक्त एक निवडणूक जिंकण्यासाठी कोणी आपल्या सुनेला परकं म्हणत असेल, तर राजकारणात एवढी वाईट वेळ कुणावरही येऊ नये”, असे ते म्हणाले.
सुप्रिया सुळेंनाही केलं लक्ष्य
पुढे बोलताना त्यांनी सुप्रिया सुळे यांनाही लक्ष्य केलं. “मागच्या १५ वर्षात तीन वेळा खासदार राहिलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नेत्या, जगप्रसिद्ध संसदरत्न यांनी आपल्या कल्पनेतून एकतरी प्रकल्प बारामतीत आणला का?” अशी खोचक टीका त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली.
नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेत बोलताना बारामतीकरांनी लेकाला, बापाला, लेकीला निवडून दिले. आता सुनेला निवडून द्या, पवार आडनावाच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन केले होते. यासंदर्भात बोलताना, अजित पवार हे काहीही चुकीचे बोलले नाहीत. मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार, हा फरक ओळखा, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली होती.