आज राज्यात शेतकऱ्यांवर वाईट परिस्थिती आहे. परतीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या सरकारचे कृषीमंत्री तर सोडा, इतर मंत्रीदेखील कुठं फिरताना दिसत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर केली आहे. तसेच हे सरकार केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सत्तेत आले असून त्यांना दुसरं काहीच दिसत नाही, असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे. आज पुणे दौऱ्यावर असताना ते पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा – “राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा”; राज ठाकरेंचे शिंदे सरकारला पत्र, म्हणाले, “ऐन दिवाळीच्या तोंडावर….”
नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?
“शेतकऱ्यांवर वाईट परिस्थिती आहे. परतीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या सरकारचे कृषीमंत्री तर सोडा, इतर मंत्रीदेखील कुठं फिरत आहेत, हे माहिती नाही. शेतकरी संकटात असताना राज्यात सरकारचे अस्थित्त्वच दिसच नाही. विरोधी पक्ष या समस्येवर आवाज उठवत आहे. मात्र, सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लेक्ष करत आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. तसेच हे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेत आलेलं नाही, तर केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सत्तेत आले आहे. त्यामुळे स्वत:च्या स्वार्थाशिवाय त्यांना काहीही दिसत नाही” , असा टोलाही त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला आहे.
“हे राज्याच्या संस्कृतीला परवाडणारे नाही”
“या सरकारला शेतकऱ्याचे नुकसान दिसत नाही, मंत्र्यांनी प्रवास करावा की न करावा, हे त्यांना माहिती नाही. विरोधी पक्ष जेव्हा एखादी मागणी करतो, त्याकडे जाणीवपूर्वक राजकारण म्हणून दुर्लक्ष करणे, हे राज्याच्या संस्कृतीला परवाडणारे नाही”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा –राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार का? कृषीमंत्री सत्तार स्पष्टच बोलले; म्हणाले “मंत्रीमंडळ बैठकीत…”
“…म्हणून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही”
“परतीच्या पावसामुळे पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून ठेवले, ते खराब झाले आहे. एकतर या सरकारने मंत्रीमंडळ विस्तार उशीरा केला, त्यात पालकमंत्र्यांच्या नावं उशीरा घोषित केली. याचा परिणाम असा झाला की, कोणतीही विमा कंपनी याबाबत शेतकऱ्यांना दिलासा द्यायला तयार नाही. ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला असताना, कुठेही पंचनामे झालेले नाहीत. याबाबत मी तीन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची मागणी केली” असल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली.